पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करण्यास भाग पाडते. 'देवाची बाई' देवदासी समस्येवर बेतलेली कथा, माणसांच्या देवत्वामागे दडलेल्या लैंगिक दैत्यांचा मुखभंग करते.
 संग्रहातील अन्य ‘सूड', 'बर्थ डे’, ‘पमी आणि बंटी', 'परीक्षा’ ‘उपवास कथाही याच पठडीतील. 'कावळे आणि माणसं' वाचताना मला सतत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की कथाकार प्रत्यक्ष घटना, पात्र, प्रसंगांना काल्पनिक कॅनव्हासवर रंगवतोय. 'माणसांचे रंग' शोधणारा कथाकार जीवन रेषांद्वारे मानवी संबंधाचे ताने-बाने विणतोय. कवी, निरीक्षक, कल्पक, चित्रकार, पत्रकारांची तमाम वैशिष्ट्ये घेऊन जाणाच्या या कथाकारांच्या कथा वाचणे म्हणजे माणसाचे ज्वलंत आयुष्य अभ्यासणं होय.
 ‘कावळे आणि माणसं' च्या कथाकाराने शिळोप्याचा वेळ घालवण्याचा ऐसपैस उद्योग म्हणून त्या लिहिल्या नाहीत. त्यामुळे वामकुक्षीच्या वेळी पहुडत वाचण्याच्या त्या कथा नाहीत. झोप लागण्यासाठी म्हणून वाचणा-यांच्या हाती हे पुस्तक गेले तर त्यांची झोप उडेल. झोप उडवणाच्या कथांची आज मला अशासाठी अधिक गरज वाटते की बंद सदनिका संस्कृतीने माणसाचे संवेदनेचे एकेक कप्पे बंद करत आणत त्यांच्या डोळ्यांवर आत्मकेंद्रिततेचे असे झापड पांघरलेय की तो आता स्वत:पलीकडे पाहायला तयार नाही. विचार करण्याची गोष्ट फार दूर.
 कधी काळी साहित्य कल्पनेतून जन्माला यायचे. अलंकारिक भाषा हे त्या साहित्याचे भूषण असायचे. त्या साहित्याच्या समीक्षेच्या मोजपट्ट्या व चौकटीही वेगळी असायची. हे सारे मोडणाच्या उत्तम कांबळे यांच्या कथांचा विचार करायला समीक्षेची नवी परिमाणे शोधणे आवश्यक आहे. या संग्रहातील सारी कथानके संक्षिप्त आहेत. त्यात छोट्या कुपीत जीवनाचा व्यापक आशय पेलण्याची क्षमता आहे. कथांतील संवाद सहज जसे आहेत तसेच ते कधी वाचकास अस्वस्थ करतात, तर कधी अंतर्मुखही.

कथेतील वातावरण चित्रण हा सर्वच कथांचा गाभा होय. सान्या कथा जीवन चित्रणकेंद्री होत. कथांतील पात्रे प्रत्येक वाचकाला परिसरातील परिचितांचे स्मरण देण्याइतकी सहज, परिचित नि म्हणून स्वाभाविक. त्यांच्या चित्रणास लेखकास कृत्रिम, दुर्बोध शैलींचा आधार धुंडाळावा लागत नाही. कथांची भाषा परिनिष्ठित आहे. कुठे कुठे बोलीचा उपयोग झालाय. कथांचा उद्देश सामाजिक समस्यांचे चित्रण करत त्यांचे निराकरण असल्याने 'कावळे आणि माणसं' ही रचना सोद्देश ठरते. कथांची शीर्षके छोटी पण वेधक आहेत. मराठी नवकथेत वंचितांचे साहित्य दालन थाटायचे झाले तर हा कथासंग्रह ठेवल्याशिवाय

वेचलेली फुले/६२