पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘कावळे आणि माणसं' : संघर्षाशील सत्यशोधक कथा


 आतड्यात पेटणारा भुकेचा अग्नी स्मशानात धगधगणाच्या चितेपेक्षा प्रबळ असतो... प्रतिष्ठेच्या बुरख्यात माणूस आपलेपण, ऋणानुबंधही झुगारतो... रांगेत रेंगाळणारे माणसाचे आयुष्य एक नवे तत्त्वज्ञान घेऊन विकसित होतेय. माणसाचे आयुष्य मृत्यू बेट झालेय... नवश्रीमंत तरुणांना पैशाच्या जोरावर दुस-याची अब्रू उसवण्याचा छंद जडलाय...पत्रकारांना मतलब असतो बातमी, प्रसिद्धी, चर्चा, अभिनंदन, श्रेय, फुशारकीचा, भले त्यात बातमीचा बळी ठरलेल्याचे काहीही होवो...कार्यकर्ते मंडळी समाजकार्याच्या धुंदीत मूळ उद्दिष्टांनाच बेमालूम तिलांजली देत असतात अशी कितीतरी जीवन निरीक्षणं नि निष्कर्ष नोंदवणारा कथाकार उत्तम कांबळे यांचा नवप्रकाशित कथासंग्रह 'कावळे आणि माणसं' म्हणजे सध्याच्या गुंतागुंतीच्या मानवी जीवन संबंध व संघर्षामागील सत्याचा शोधक वृत्तीने घेतलेला वेध होय, मूळ कवी नि पत्रकार वृत्ती असलेला हा कथाकार. रोजच्या बातमीचा वेध घेणा-या घाईच्या जीवनात प्रसंग निवडत टिपत राहतो. स्वास्थ्याने त्याच्या सुंदर कथा करतो. त्यामुळे ‘कावळे आणि माणसं' च्या कथांना सत्यकथेचे रूप येते. पत्रकाराच्या पेनमध्ये ‘शाई' नाही तर 'घाई' भरलेली असते.' असे म्हणणाऱ्यांना त्या पेनमध्ये ‘संवेदनेची डूब' व 'समाजपरिवर्तनाचा ध्यास' ही भरलेला असतो, असा आश्वासक दिलासा देणारा हा कथासंग्रह आहे. वर्तमानाच्या व्यामिश्र जीवनाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या सर्वांनी आवर्जून वाचायला हवा.

 'कावळे आणि माणसं' ही या संग्रहातील शीर्षक कथा. शिल्पाच्या दृष्टीने पाहिले तर ती दीर्घ कथा होय. पत्रकारात निरीक्षक दडलेला असतो तसा चित्रकारही. स्मशानासारखी जागा पार्थिव जीवनाचा अंत करणारी अटळ शरणस्थळी. तिच्या अनिवार्य अस्तित्वाची सतत उपेक्षाच करत आलोय! स्मशान मानव जीवन चरित्राचा अभ्यास करणा-यांसाठी एक स्वाभाविक टेहाळणी बुरूज' इथे माणसांचे खरे चेहरे दिसतात. इथं माणसांचे नक्राश्रूही ढळताना पाहतो...' ‘जिवंत असता लाथा देती, मरता घेती खांद्यावरती। जगाचा उलटा न्याय, मेल्यावरती सन्मान।।' म्हणणार्‍या कवीला दिसलेले

वेचलेली फुले/६०