पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/207

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अब तक पकडा?' म्हणून प्रेक्षकांचे तावातावाने विचारणे हे 'रिंगण' चे यश होते. परिणाम होता नि प्रभावही!

 ‘रिंगणनाट्य' पुस्तक तसे पाहिले तर 'रिंगण' नाट्यप्रकाराच्या निर्मितीसाठी घेतलेल्या कार्यशाळेचा वृत्तांत. पण या पुस्तकास ‘रिंगण' संहिता असे रूप येऊन गेलेय. हे पुस्तक मुखपृष्ठापासूनच वाचक व नाट्यप्रेमींची पकड घेते. मुखपृष्ठ लक्षवेधी (आकर्षक) आहे नि ‘लक्ष्यकेंद्री' (हेतुकेंद्री) ही! आसपासची पाने कार्यशाळेचे नैसर्गिक सौंदर्य दाखवतात. नाटकाप्रमाणे या पुस्तकाचा प्रारंभही 'रसिकजनांच्या रसिक मनाला वंदन आम्ही करितो' या नांदीने होते. ‘रिंगण धरण्यापूर्वी प्रस्तावनेत नाटक कार्यशाळेचा वृत्तांत देण्यापूर्वी लेखकद्वय 'रिंगण' नाट्यामागील पार्श्वभूमी विशद करतात. त्यातून ‘रिंगण विश्व उभे राहते. रिगणनाट्य एका कार्यशाळेचा वृत्तात असला तरी नाटक प्रक्रिया समजावणारी संहिता म्हणून या पुस्तकाचे आगळे महत्त्व आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलन कार्य करायचे. त्यांच्या निघृण हत्येच्या कृतिशील, सनदशीर, सर्जनशील निषेधाचे साधन म्हणून 'रिंगण' चा जन्म झाला. ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम' हे नाटक प्रा. राजाभाऊ शिरगुप्पेंनी लिहिले. या संहितेस विजय पोवारांच्या दिग्दर्शनाने आकार आला. प्रा. संजय बनसोडे, प्रा. एकनाथ पाटील यांच्या पुढाकाराने इस्लामपूरच्या कार्यकर्त्या कलावंतांनी 'महाराष्ट्र अंनिस लोकरंगमंच'च्या माध्यमातून पहिले 'रिंगण' सादर केले.

 'रिंगण' नाटक 'मासूम', 'साथी सेहत', 'एफ.आर.सी.एच.', ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’, ‘नाथा', 'हॅलो मेडिकल फाउंडेशन’, ‘युनिसेफ', 'पानी', 'गोकुळ', 'परिवर्तन', 'राष्ट्र सेवादल', 'बाएफ', 'मावा', 'यशदा', 'बार्टी', ‘सर्वहरा जनआंदोलन', सारख्या अनेक संस्थांच्या कार्यशाळेच्या अनुभवातून उदयाला आलेले नाट्यरूप. अतुल पेठे यांनी 'वेटिंग फॉर गोदो', ‘सूर्य पाहिलेला माणूस', 'सत्यशोधक', ‘चौक’, ‘गोळायुग', या नाट्यकृतींचं दिग्दर्शन केलेले आहे. तसेच ‘कचरा कोंडी', 'सेझ', 'तेंडुलकर आणि हिंसा', 'नाटककार सतीश आळेकर', 'कोसला' इ. चित्रपटांना त्यांनी साकारलेय. गेली चार दशके ते नाटकाशी खिळून खेळताहेत. 'रिंगणनाट्य' पुस्तक दि. २५ ते २९ मे, २०१६ रोजी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर येथे ‘महाराष्ट्र अंनिस लोकरंगमंच'तर्फे आयोजित 'रिंगण' कार्यशाळेचा वृत्तांत आहे. यात रिंगण नाटकाच्या तीन संहिताही आहेत. हे पुस्तक एका अर्थाने नाट्य कार्यशाळेचा वस्तुपाठ म्हणूनही पाहता येते. ही या पुस्तकाची आणखी एक जमेची बाजू होय.

वेचलेली फुले/२०६