अतुल पेठे, राजू इनामदार हे नाट्यकर्मी सफदर हाश्मी, बादल सरकार, हबीब तन्वीर इ. नाट्यकर्मीचे वंशज म्हणून पाहता येतील. त्यांनी घेतलेल्या पाच दिवसांच्या कार्यशाळेत प्रत्येक दिवशी 'रिंगण'च्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख करून देण्यात आली. या कार्यशाळेचा विषय होता ‘संविधान'. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत (प्रिअँबल) सांगितलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद ही मूल्ये मानून 'माणूस' नावाचा समाज घडविणारे नाटक रचणे, रिंगण धरणे हा या कार्यशाळेचा हेतू होता. काही संघटना कारस्थान शाळा योजतात. तिथे हिंसू निर्माण केले जातात. इथे असे नव्हते. दर्जा व संधीचे संविधानिक आश्वासन लक्षात घेऊन सामाजिक न्यायाच्या दिशेने स्त्री-पुरुष समानता, दलितांविषयी सहानुभूती, वंचितांप्रती भावसाक्षरता, लोकशाहीवरील विश्वास, असंहितेची दृढता यावर भर देणारी व्याख्याने, लेख वाचन, चर्चा, घोषणा गाणी तयार करत ‘सापडलं रे सापडलं' सारखं रिंगण नाटक तयार करणे, त्याचं सादरीकरण व त्याला मिळालेल्या प्रेक्षक प्रतिसादाचे मूल्यमापन असे या कार्यशाळेचे नियोजन होते. नियोजनाबर हुकूम कार्यवाही हा खास अतुल पेठेकृत समर्पण व समर्पक परिणाम! या शिवाय जिज्ञासूसाठी सदर पुस्तकात संविधानविषय घोषणा, गाण्यांचा (जी शिबिरात तयार झाली) खजिना आहे. तसेच ‘ऐसे कैसे झाले भोंद' या अंधश्रद्धा निर्मूलनविषयक रिंगण नाटकाची आणि ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम' ची मूळ संहिता वाचावयास उपलब्ध आहे. ज्यांना 'रिंगण' धरायचे आहे, कार्यशाळा योजायची आहे त्यांच्यासाठी ‘रिंगणनाट्य' पुस्तक मार्गदर्शिकाच होय.
याशिवाय हे पुस्तक नाटकाविषयी ब-याच गोष्टी समजावते. हे कलेतून वैचारिक दृष्टिकोन विकसित करायचे साधन आहे. ते माणूस बदलाचे माध्यम आहे. सर्व काळात कलावंत, विचारक, वैज्ञानिक, विवेकवादी यांना सनातन, प्रतिगामी शक्ती सॉफ्ट टार्गेट' म्हणून पाहात आलेत. पण समाजाचा विवेक व विचार कधीच मरत नसतो व हत्येने तो संपवता येत नाही असा दृढ विश्वास हे पुस्तक देते. हे कळून आश्चर्य वाटते की भारतात फक्त महाराष्ट्र व गुजरात राज्यातच नाटक संहितेस परीनिरिक्षण मंडळ (सेंसॉर बोर्ड) कडून मान्यता मिळाल्यावरच नाटकाचे खेळ करता येतात. त्यामुळे नाटकासाठीचे सेंसॉर बोर्ड त्वरित बरखास्त करावे अशी मागणी करण्याचा सुविचार वाचक म्हणून माझ्या मनात उत्स्फूर्त झाला. तो तुमच्या मनात येईल तर ती 'रिंगणनाट्य' पुस्तकाची फलनिष्पत्ती म्हणून भविष्यकाळात नोंदवली जाईल व जावी. अशा कार्यशाळा म्हणजे कार्यकर्ते, कलावंत घडविणाच्या प्रयोगशाळा