देशाचा ध्यास लागला की तो पराकोटीचा खरेच सार्वजनिक होतो का? एस. एम. पदवीधर होईपर्यंत घरगुती उल्लेख येतात. आई-वडील, भाऊ-बहीण व अन्य नातलग, पण ते उल्लेख पार्श्वभूमी म्हणून येतात. ते या आत्मकथेचे केंद्र नव्हे. एस. एम. जोशींनी प्रेमविवाह केला. इतकाच प्रेमाचा उल्लेख. तीच गोष्ट संसार व अपत्याची. त्यांना एक मुलगा होता. त्याचे नाव अजय होते. पत्नीचे नाव ताराबाई. चरित्र नायक प्रारंभापासूनच घरशत्रू. कधी भूमिगत म्हणून तर कधी सामाजिक राजकीय कार्य म्हणून, भूमिगत अवस्थेत तो इमाम अली बनतो. दाढी राखतो, मुसलमानी पेहराव करतो. अधी मधी भेटतो. इतक्या त्रोटक उल्लेखाने एस. एम. जोशी यांनी आपले व्यक्तिगत जीवन चित्रित केले आहे. ते लाक्षणिकच म्हणावे लागेल. तुम्ही सूक्ष्मात जाऊन उत्खनन करू पाहाल तर लक्षात येईल की, या माणसाने लाक्षणिक अर्थानेच संसार केला. ताराबाई शिक्षिका होत्या. त्या अर्थाने स्वावलंबी होत्या. घर संसार स्वावलंबी असणं म्हणजे समाजपुरुषाने व्यक्तिगत जीवनावर तुळशीपत्र ठेवणे असेल, तर तो घरच्यांवर अन्याय असे सर्वसामान्यांना वाटते. पण ज्यांनी समाज हाच आपला संसार मानला, त्या एस. एम., जयप्रकाश, सानेगुरुजी यांना व्यक्तिगत विचार हाच मुळी अपराध वाटतो. एस. एम. जोशी यांचं जीवन सार्वजनिक होते ते या परहित केंद्री जाणिवेमुळे. यातच त्यांचे असामान्यत्व आहे आणि ते या आत्मचरित्रात प्रारंभापासून ते शेवटापर्यंत पसरलेलं दिसून येतं.
राष्ट्रसेवा दल
स्वातंत्र्य चळवळीने एस. एम. जोशींना सामाजिक व राजकीय भान दिले. हे आत्मचरित्र वाचत असताना लक्षात येते की, त्यांचे राजकीय कार्य हे समाज जाणिवांवर उभे आहे. समाजभानाचा त्यांचा पाया आहे राष्ट्रसेवा दल. ते केवळ या संघटनेचे संघटक, सर्व वेळ सेवक नव्हते. तर संस्थापकांपैकी एक होते. सेवादलाच्या ध्येय व कार्यक्रमाने एस. एम. जोशी यांच्या आंतरिक जीवनाचा कायाकल्प घडवून आणला होता. एस. एम. तरुणपणी सेवादलाबरोबर कामगार संघटन कार्य करायचे. पण ट्रेड युनियनपेक्षा त्यांना सेवादल महत्त्वाचे वाटायचे. कारण यातून आपण भारताची उद्याची जबाबदार पिढी घडवत आहोत याचे समाधान होते. या समाधानाचा पाया सेवा दलाचे ध्येय होते. ते समतेच्या मूल्यावर आधारित होते. एस. एम. जोशींना सामाजिक व राजकीय चळवळीतून एक गोष्ट लक्षात आली होती की या देशाची खरी समस्या भेदाभेद व विषमता आहे. या जाणिवेतून त्यांचा समाजवादी पिंड घडला.