पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देशात स्त्री-पुरुष, उच्च-नीच, हिंदू-मुसलमान असे लिंग, स्थिती, धर्म, संस्कृती, जाती, पंथ भेद असून तो देशाच्या एकात्मतेतील अडथळा आहे. भाषेमुळेही देश दुभंगल्याची भावना एस.एम.यांच्या मनी होती. केवळ हिंदी राष्ट्रभाषा करून देशाचा भाषा प्रश्न सुटणार नाही. मी त्या चळवळीत असताना ते महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे अध्यक्ष होते. आम्ही आंदोलन करत होतो. मार्गदर्शन मागितल्यावर त्यांनी लिहिले होते की ‘दक्षिण व उत्तर भारतीय जोवर एकमेकांच्या भाषा शिकणार नाहीत, तोवर देश एक होणार नाही. ही दृष्टी त्यांना भारत भ्रमणातून आली होती. आंतरजातीय विवाह, एक गाव एक पाणवठा, श्रमदान, कलापथक, अभ्यास वर्ग, शिबिरे यातून ते नवा जातीधर्म निरपेक्ष, लोकशाहीवादी, विज्ञाननिष्ठ, समान, बंधुत्वाधारित भारत निर्मितीचं त्यांचे स्वप्न केवळ आदर्शवाद नव्हता तर व्यवहारावर उभा तो नवनिर्मितीचा प्रयोग व प्रकल्प होता हे राष्ट्रसेवा दल संबंधी या आत्मचरित्रातील प्रकरण वाचताना जाणवते.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन

 स्वातंत्र्य लढा तीव्र झाल्यावर आणि विशेषतः सविनय कायदेभंग, असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, भारत छोड़ो आंदोलन यामुळे सन १९४६ च्या सुमारास भारतीय स्वातंत्र्यतासेनानींना स्वातंत्र्य हे आपल्या दृष्टिक्षेपात आल्याची भावना निर्माण झाली होती. सन १९३५ नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना, स्वकीय सरकार यामुळे तर ही खात्री विश्वासात बदलत गेली होती. याच सुमारास सन १९४६ ला बेळगावात अखिल भारतीय साहित्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनात 'संयुक्त महाराष्ट्र' या मराठी भाषिक स्वतंत्र प्रांताची मागणी करण्यात आली. पुढे शंकरराव देवांच्या नेतृत्वाखाली ‘संयुक्त महाराष्ट्र परिषद' स्थापन झाली. या मागणीच्या आधारावर पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्रिराज्य योजनेची महागुजरात, मुंबई आणि विदर्भासह महाराष्ट्राची घोषणा झाली. परिषदा, संप, मोर्चे, अटकसत्र झाले. द्वैभाषिक राज्याची कल्पना उधळण्यात आली. गोळीबारात अनेकांचे बळी गेले. १९५६ ते १९६० हा लढ्याचा तीव्र काळ होता. शेवटी नेहरूंना १ मे, १९६० रोजी स्वतंत्र मराठी राज्याची घोषणा करणे भाग पडले. या लढ्याचे नेतृत्व एस. एम. जोशी यांनी केले होते. आचार्य अत्रे, श्रीपाद डांगे, दत्ता देशमुख प्रभृती मान्यवरांनी सामूहिकपणे हा लढा दिला म्हणून यश आले. पुढे संयुक्त महाराष्ट्र समितीस पक्ष बनविण्याच्या कल्पनेवर मतभेद झाले व एस.एम.यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. तरी यशवंतराव चव्हाणांना एस. एम. जोशींच्या लढ्यातील योगदानाची जाणीव होती. पण एस. एम. जोशी केवळ महाराष्ट्र राज्य निर्मितीवर समाधानी नव्हते. बेळगाव, कारवार,

वेचलेली फुले/१९२