'मी एस. एम.' : सामाजिक चरित्राची राजकीय गाथा
पार्श्वभूमीः
‘मी एस. एम.' हे समाजवादी राजकारणी एस. एम. जोशी यांचे आत्मकथन होय. ‘मनोगत' मध्ये त्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे ते त्यांनी स्वत: बसून लिहिलेले नाही तर या आत्मकथनाचे शब्दांकन रामकृष्ण तथा तात्या बाक्रे यांनी केले आहे. सन १९८४ ला एस. एम. जोशी यांना ८0 वर्षे पूर्ण होत होती. ‘सहस्त्रचंद्रदर्शन योग जुळून आल्याप्रीत्यर्थ हे आत्मकथन मौज प्रकाशन, मुंबईने प्रकाशित केले. सुमारे ४४0 पृष्ठांचे हे आत्मकथन. त्यात एस. एम. जोशी यांनी जन्मापासून (१९०४) ते सन १९८० पर्यंतची सुमारे आठ दशकांची जीवनकथा वर्णिली आहे. त्यांचा मृत्यू १९८९ साली झाला. ते लक्षात घेता ती समग्र जीवन कहाणी म्हणावी लागेल. कारण सन १९८४ नंतरचा त्यांचा काळ राजकारण संन्यासाचा राहिला. आत्मकथनास समांतर ‘एस. एम.' नावाचा सर्वश्री मधु दंडवते, मधु लिमये, प्रेम भसिन, बाबा आढाव, भाई वैद्य प्रभृती मान्यवरांनी एक गौरव ग्रंथ प्रकाशित केला होता. तत्पूर्वी सन १९६३-६४ मध्ये षष्ठब्दिपूर्तीचे औचित्य साधून सर्वश्री वि. स. खांडेकर, अनंत काणेकर, अनंत भालेराव, चंद्रशेखर धर्माधिकारी, ग. प्र. प्रधान, अ. भि. शहा, मधु पानवलकर व पन्नालाल सुराणा प्रभृती मान्यवरांनी ‘एस. एम. जोशी गौरव ग्रंथ' प्रकाशित केला होता. या साच्यातून लक्षात येते की एस. एम. म्हणजे सौजन्य मूर्ती, सच्चा माणूस, सज्जन महामानव नि सत्त्वशील महात्मा!
“मी एस. एम.' आत्मकथा म्हणून प्रकाशित झाली असली तरी तीत जन्मापासून ते युवावस्थेपर्यंतचेच आत्मकथन आहे. सन १९२८ ते १९८0 हा सुमारे पाच दशकांचा यातील काळ ‘आत्म' हीन, ‘पर हितलक्ष्यी, समाजशील जीवनाची ती राजकीय गाथा, कथा होय. उत्तरार्धात भूमिगत असताना वा अटक झाल्यानंतर पत्नी व पुत्र भेटीचे दोन अपवाद प्रसंग सोडले तर ही कहाणी महाराष्ट्र व भारताच्या समाजवादी राजकारणाचा लेखाजोखा म्हणून, ‘चक्षुर्वैसत्यम्' म्हणून तिचे ऐतिहासिक महत्त्व आहे.