Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ‘राजनीती वारांगने' असे संस्कृतमध्ये लिहून ठेवले आहे. इंग्रजीत Politics is a game of squander असं म्हटले जाते तर हिंदीत ‘बाँको का क्षेत्र वर्णिले गेले आहे. अशा पाश्र्वभूमीवर लोकनायक जयप्रकाश एस. एम. जोशींबद्दल लिहिताना जेव्हा असे म्हणतात की, S. M. Joshi is not a politician. He is political revoluntionary and activist. ते खरे त्यांच्या जीवन व कार्याचे वस्तुनिष्ठ व यथार्थ मूल्यांकन वाटते किंवा आचार्य विनोबा भावे जेव्हा म्हणतात- S. M. Joshi could not make a successful politicion because he could not tell a lie तेव्हा ते एस. एम. जोशींसाठी ‘बोनाफाईड सर्टिफिकेट' मानले जाते. एस. एम. जोशी यांची ही आत्मकथा राजकारणासंबंधी पूर्वापार सारे आडाखे खोटे ठरवते म्हणून हे आत्मकथन राजकारणातील अंधारातला कवडसा म्हणून पुढे येते. ते केवळ वाचनीय न राहता विचारणीय, अनुकरणीय ठरते, हीच या आत्मकथेची सर्वांत मोठी देणगी होय.

मनोगत

 आत्मकथेच्या ‘मनोगत'मध्ये एस. एम. जोशींनी लिहिले आहे की, ‘आत्मचरित्र लिहिण्याइतकी सत्यनिष्ठा आणि लेखन कौशल्य मजकडे नाही.' पण वाचताना हे खोटे ठरते. साऱ्या गोष्टी सत्यनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे लिहिणे काही सोपे नाही, असे ते म्हणत असले, तरी त्याचा एक पारदर्शी वस्तुपाठ एस. एम. जोशी यांनी या आत्मकथनातून समाजास घालून दिलाय खरा हे मात्र खरे आहे की, ते एक सामान्य माणूस', ओबडधोबड, सरळसोट, खरे! राजकारण हा बुद्धिबळाचा पट मानला तर इथे साऱ्या चाली त्यातील उंटाप्रमाणे तिरक्या (तरी सरळ!) चालाव्या लागतात. एस. एम. जोशींनी पाने लपवून कधी पत्त्याचा डाव खेळला नाही. राजकारणाने सतत त्यांना लपंडाव खेळायला भाग पाडले. पदांचे कितीतरी खो या माणसाने सहन केले, पण त्याने आपल्या हरिश्चंद्राचे वस्त्रहरण होणार नाही याची सजगपणे काळजी वाहिली. ती त्यांची सचोटी होती. एस. एम. जोशी आपल्या आयुष्यात जे चांगले घडले त्याचे श्रेय परिस्थितीला देत असले, तरी तो त्यांचा विनय आहे. माणसाचा चांगुलपणा असेल तरच राजकारणाच्या खेळात सोंगट्या सुलट पडत असतात. त्यामुळेच अशक्य ते शक्य करिता सायास' म्हणून ते कठीण परिस्थितीत निवडणूक जिंकतात. हे मात्र खरे आहे की, लौकिक कसोटीवर त्यांचे जीवन अपयशी ठरले. त्यांच्यासारखा माणूस या देशाचा खरं तर राष्ट्रपती होता, तर देशाचे आजचं दुश्चरित्र घडले नसते. माणूस मोठा कोण जो अंतरात्म्याच्या

वेचलेली फुले/१८६