पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/170

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘ज्वाला आणि फुले' मधील कविता म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही व पंचशीलाचे खुले समर्थन. बाबा अध्यात्मापेक्षा विज्ञान श्रेष्ठ मानतात. आचार्य विनोबांबद्दल पूर्ण आदर व्यक्त करूनही त्यों सूक्ष्मात जाणे, अतींद्रिय होणं बाबांना पटत नाही. जग उड्डाण घेत असता अजूनही तुझी प्रजा स्थितच का?' असा प्रश्न करून ते स्पष्ट बजावतात,

 ‘स्थितप्रज्ञ नको आहेत आज
 आकाशगामी प्रज्ञागती हवे आहेत आता
  ‘पंखांना क्षितिज नसते' कवितेतील हा संवाद कवीच स्पष्ट करतो. धर्म, अध्यात्म यांसारख्या गोष्टी म्हणजे अफूची गोळी तद्वतच शृंखला. व्रतवैकल्ये, माणसाला आत्मवंचक बनवतात. त्यामुळे माणूसही अभागी- अभावपूजक होतो. माणसापुढे आदर्श असले पाहिजेत. ब्रह्मांड कवेत घेऊ पाहणा-या व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा, कॉनरॅड हिल्टन यांचे, जोवर माणूस विज्ञाननिष्ठ होणार नाही तोवर तो ‘आनंद पक्षी' होणार नाही, असे बाबा आमटे म्हणतात. ही कविता नव्या मनूचे आवाहन होय. या आवाहनाला आकाशभेटीच्या कर्तृत्वाचा अर्थ आहे. गाभा-यात करंजीच्या तेलाचे दिवे जाळून युगे गेली... माणसाच्या आत्म्याचे घर उजळले नाही. विश्वाचे घर कसे उजळणार? असा बाबांचा सवाल आहे.
 ‘उत्तरवाहिनी' ही कविता गंगेपेक्षा श्रमगंगा कशी श्रेष्ठ ते सांगते. तिच्यात उद्याच्या श्रमयुगाचे स्पंदन आहे. यात श्रमतंत्राचा विस्तार आहे. विध्वंसाजागी विधायक बीजे पेरणारी श्रमगंगा व श्रमवीर हवे आहेत. वांझ वैराणातून फुलवायचे आहेत, सौभाग्याचे द्राक्षमळे' म्हणून बाबा सांगतात, 'गोगलगाईच्या गतीने साथीला आलेले दैन्य पळवायचे असेल, तर अणुयुगातील नवतंत्रांचे हरण-टप्पे हवे आहेत.

 ‘वधस्तंभाच्या छायेत' यामध्ये कुष्ठपिडीतांच्या पुनर्वसन कार्यामागील आपली भूमिका ते मांडतात. अजंठा-वेरूळमधील पाषाणांच्या भग्न मूर्तीतील सौंदर्यापेक्षा हाताची बोटे, तळवे, झडल्याने निर्माण होणारे कारुण्य अधिक महत्त्वाचे असते. ‘मरण भोगुनि हसत राहती ते मृत्युंजय' म्हणून कुष्ठपीडित त्यांना धडधाकट माणसापेक्षा जास्त आश्वासक, पराक्रमी, भगीरथ वाटतात. सोमनाथच्या जंगलात बोटे झडलेली माणसे दोन तळव्यात पहार पकडून काळ्याकभिन्न पत्थराला पाझर फोडत विहीर खोदताना बघितल्यावर मी स्वत:ला स्वस्थ बसू दिलेले नाही.

 ‘ज्वाला आणि फुले'मध्ये एकलव्य, विश्वामित्र, प्रॉमिथियससारखी चरित्रे,

वेचलेली फुले/१६९