पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाटायचे. आमची शाळा साने गुरुजींचे स्वप्न म्हणून सुरू झालेली. ‘ज्वाला आणि फुले' मधील कविता साधनेत छापून येत. वाचल्या तर डोक्यावरून जात. पण वर्गात बाबा आमटेंचा घोष असायचा. त्यामुळे त्या कविता पाहायचो. शालान्त परीक्षा झाल्यावर त्याच सुट्टीत काही मित्रांबरोबर मी सोमनाथ श्रम शिबिरात गेलो. बाबा आमटे भेटले. चांगले पंधरा दिवस. त्या भेटीने माझा जणू कायाकल्प झाला. आपल्या पलीकडे पाहण्याचा, विचार करण्याचा, संस्कार घेऊन परतलो. पुढे गारगोटीच्या मौनी विद्यापीठात असताना कोयना भूकंप निवारण कार्यात सहभागी झालो. त्यातून विधायक वृत्तीचा विकास झाला, असे आज वाटते. शिक्षक व्हायचे ठरवले. शिक्षकांच्या पहिल्या पगारात माझ्या मित्रांनी घड्याळ, कपडे वगैरे घेतले, मी ठरवून ‘ज्वाला आणि फुले' घेतले. पदवीधर झाल्यावर समज आल्यावर वाचलेले ते पहिले पुस्तक होते. ती त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती होती. तिला खांडेकरांच्या दोन प्रस्तावना होत्या. “ज्वाला आणि फुले' मधील कवितांचे वर्णन खांडेकरांनी ‘लोकविलक्षण आत्म्याचे उर्जस्वल शब्दविलसित' असे केले होते. या संग्रहात २४ कविता आहेत. प्रत्येक कविता नवा विचार, व्यक्ती, चरित्र, संस्कार, मूल्य, दृष्टी घेऊन येते. काव्यात्मकता, नाट्यमयता, मिथक, प्रतीक, गद्यशैली, समाज चिंतन वगैरे वैशिष्ट्ये घेऊन येते. सहका-यांशी केलेल्या संवादाची ती इतिश्री होय.

 बावनकशी अनुभवातून उतरलेली ही कविता विचार व शब्दशक्ती दोन्ही अंगांनी ज्वालामुखी ठरावी अशी. या कवितेस काव्यसमीक्षेची शास्त्रीय परिमाणे भले लागू पडत नसतील, पण ती वाचक प्रमाणित होती खरी! जीवनाच्या प्रत्येक प्रसंगाला इतिहास, पुराणाचा दाखला देत, वर्तमानाची चिकित्सा करत ती भविष्यवेध घेते. असे त्रिकालाबाधित आकलन घेऊन येणा-या ‘ज्वाला आणि फुले' मध्ये फुलांचे लालित्य जसे आहे तसेच ज्वालेतील प्रखरताही! तो कवीचा अंतर्यामी उद्गार असल्याने त्यात अनुभवजन्य तत्त्वज्ञान आपसूक असते. ‘शतकांचे शुक्र' ही पहिली कविता बाबा आमटे यांच्या काव्यलेखनाची भूमिका मांडते. या कवितेत कवीच्या काव्याचे शुक्रतंतू (जंतू नव्हे) दिसतात. माणूस शतकांचे संस्कार घेऊन जन्मतो, तशी त्याची कविताही. या कविता प्रेरणा गीतांसारख्या आहेत. त्या वाचताना आपल्याला जागोजागी थांबवतात. विचार करायला भाग पाडतात अन् पुढे कालौघात, अनुषंगिक कृतीलाही प्रवृत्त करतात. ‘शतकांचे शुक्र, द्वंद्व गीत आहे. गीत-संगीत, विचार-आचार, दृष्टांत-मिथक, व्यक्ती-चरित्र, चरित्र-चारित्र्य, अक्षर-आकृती, शब्द-अर्थ अशा द्वंद्वांचे अद्वैत त्यात दिसते.

वेचलेली फुले/१६८