पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/171

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिथके बनून भेटतात. महात्मा गांधी, आचार्य विनोबा, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या रूपाने आदर्श समाजपुरुष भेटतात. रवींद्रनाथ टागोर, साने गुरुजी, नित्शे भेटतात. अन् त्यांच्याबरोबर येणारे वाद विवाद, विचारधारा, तत्त्वज्ञानही। ‘एकलव्य' हा केवळ कवितेचा नायक म्हणून येत नाही. तो असतो युगाचा प्रतिनिधी, ज्ञान नाकारल्या गेलेल्या शंबुकाचा तो सहोदर असतो. तसा हजारो वर्षे शिक्षण नाकारल्या गेलेल्या दलित, वंचित वर्गाचाही तो प्रतिनिधी बनून येतो. जन्मजात प्रतिष्ठेची कल्पना झुगारत ‘मदायत्तं तु पौरुषम्' ची मोहर उठवतो. ‘जन्मवान श्रेष्ठ की कर्मवान' असा प्रश्न विचारतो. स्पर्धेचे आव्हान स्वीकारतो नि प्रत्येक स्पर्धा जिंकत राहतो. घटापटांची उतरंड नाकारतो. ‘पाप्याचं पोर' म्हणवून घेणं ठोकरतो.

 ही कविता बाबा आमटे यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान प्रकट करते. त्यांचा पिंड पोसला तो महात्मा गांधी, साने गुरुजी, गौतम बुद्ध यांच्या करुणेवर. पण ही करुणा अश्रू घेऊन जन्मत नाही. अश्रूचा सागर आटवायला निघालेल्या या आधुनिक अगस्तीला या गोष्टीचे मोठे दु:ख आहे की, या तिघांच्या जीवन दर्शनाचा पराभव त्यांच्याच अनुयायांनी केला. बाबांना विचारशरण अनुयायी नकोत. त्यांना प्रतिबद्ध कार्यप्रवण स्वकर्तृत्त्वावर जग जिंकणारे कार्यकर्ते हवेत. ‘एकलव्य' हे त्या कांक्षेचे गर्वगीत होय.

 बाबा आमटे यांना विश्वामित्र हा आपला अंतर्यामीचा आवाज वाटतो. ‘विश्वामित्र होतं ‘भुकेचं झाडं'. त्याला संतोष नव्हता. त्याने एकामागून एक कांक्षा सिद्ध केल्या... त्यात पतन... पराभवही त्याला पत्करावा लागला. ‘विश्वामित्राच्या महापतनालाही असते मेनकेचे लावण्य' हे पतनाला येणारे सौंदर्य सृष्टीच्या निर्मितीच्या ध्यासातून आलेले असते. ज्वाची स्पर्धा स्वत:शी, त्याला जिंकणार कोण?' अशी अपराजेय सामाजिक महत्त्वाकांक्षा यातून प्रकट होते.

 बाबा आमटेंच्या वाचन-व्यासंगाचा परीघ व्यापक होता. पुरोहित ते पोप, धनुष्य ते स्कायस्क्रैपर, मनु ते कॉनरॅड, सावित्री ते तेरिश्कोव्हा, वरोरा ते वॉर्सा, गांधी ते नित्शे, झांझीबार ते बॅस्टिल, भारतीय ते मे फ्लाय संस्कृती, असे चतुरस्त्र वाचन. भारतीय समाज, संस्कृतीच्या प्रश्नांवर मांड ठोकून उभारलेला हा सामाजिक दर्यावर्दी कधी कूपमण्डूक विचार करूच शकत नाही. ज्वाला आणि फुले' मधील कविता सामाजिक प्रश्न, कृतिप्रवणता, श्रम माहात्म्य, शेतकरी, श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ, सोमनाथ श्रम संस्कार छावणी, घामाचे महत्त्व विशद करणा-या आहेत. या संदर्भात ‘जिथे आत्म्याचेही अन्न पिकेल'

वेचलेली फुले/१७०