पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/164

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चरित्र ग्रंथमाला' : अभिनव उपक्रम


 सत्यशोधक समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, महाराष्ट्र समाज, थियॉसॉफिकल सोसायटी अशा विविध जीवनमार्गाच्या समाज स्थापनेतून तत्कालीन समाजसुधारकांनी विविध समाजसुधारणा करून समाजास जागे केले. त्या अर्थाने एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध हा समाजसुधारणांच्या मशागतीचा होता. विसावे शतक हे पुरोगामी प्रबोधनाचा सूर्य घेऊन उगवले. या शतकात राजर्षी शाहू छत्रपती, प्रबोधक भास्करराव जाधव, भाई माधवराव बागल, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण आप्पासाहेब पवार, कॉ. संतराम पाटील ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर, रावबहादूर पी. सी. पाटील, दलित नेते दादासाहेब शिर्के, शेतकरी कामगार पक्षाचे अध्वर्यु आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, शिक्षणतज्ज्ञ, पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक प्रभृती समाजसुधारकांनी आपापल्या क्षेत्रात जे असाधारण कार्य केले त्यातून विसाव्या शतकातील कोल्हापूरची घडण पुरोगामी बनली. अशा समाजसुधारकांचे जीवन, कार्य, विचार व सामाजिक योगदान एकविसाव्या शतकातील तरुण पिढीपुढे राहावे, त्यांची आत्मकेंद्रितता दूर होऊन त्यांनी समाजशील व्हावे म्हणून कोल्हापूरच्या श्रमिक प्रतिष्ठानने चरित्र ग्रंथमालेचा समाजोपयोगी प्रकल्प हाती घेतला आहे. कोल्हापूर संस्थानचे अधिपती राजर्षी शाहू छत्रपती यांचे जीवन, कार्य, समाज सुधारणा म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील समाजसुधारणांचे नेतृत्वच. त्याचे परिणाम पुढील काळात झाले. देशभर सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ रोवून शाहू महाराजांनी सक्तीचे मोफत शिक्षण, आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाहासंबंधीचे कायदे, विविध जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची उभारणी, राधानगरी धरणाद्वारे सिंचन विकास, शाहूपुरी व्यापारी पेठेद्वारे व्यापार उदीमास चालना, शाह मिलद्वारे उद्योगविकास असे केलेले कार्य प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी शाहू चरित्रात शब्दबद्ध केले आहे.

 भास्करराव जाधव यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोल्हापुरात केली. त्यांनी वाङ्मय, धर्म, कायदा, इतिहास, समाज, शिक्षण, उद्योग, अर्थ अशा जीवनाच्या सर्व क्षेत्रांत स्पर्श करणारे मोठे कार्य केले. प्रा. डॉ. छाया

वेचलेली फुले/१६३