पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/163

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आढळते. नावे नवी असली तरी पात्र पूर्वपरिचित, घटना इतिहासातील अशांमुळे या रचना उजाळा कथा' बनतात. सर्वत्र वर्णनाचे अधिक्य राहिले आहे. लेखक कथा निरूपणकार बनून जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी संवाद शक्यता असताना तिथं टाईप शैली अवतरल्याने शैलीच्या अंगाने कथांत एकसारखेपणा आढळतो. या कथांचे बलस्थान आहे ते घटना, प्रसंगांची गुंफण, पात्र संबंधाची रचना, त्यातील मनुष्य सुलभ हेवेदावे, स्पर्धा, वैर, राजकारण, भय, शंका आदी भाव भावनांचा कल्लोळ, यामुळे या कथा एकदम नवे विश्व घेऊन पुढे येतात व वाचक आपसूक त्यात गुंतून जातो. पुढे काय? असे वाटत राहण्याचे कुतूहल निर्माण करण्याचे लेखकाचे कौशल्य या कथांना वाचनीय बनवते. प्रतीकांचा उपयोग करून ‘बंद लिफ्ट'सारखी कथा आशयघन बनवण्याचे लेखकाचे कौशल्य प्रशंसनीयच म्हणावे लागेल. ते हास्य नव्हतं. हसरं रुदन होतं.' म्हणणारा हा कथालेखक भाषाप्रभू आहे. 'इंडियात जात हे असे सत्य आहे की, सवर्ण ते नाही असे समजून दडपण्याचा प्रयत्न करतात आणि पददलितांना पदोपदी त्याचा सामना करावा लागतो.' असे म्हणणारा हॅम (पृ.८३) इथलं जात वास्तव अधोरेखित करतो. ही असते लेखकाच्या वैचारिक बैठकीची निजखूण.

 कथालेखक म्हणून लक्ष्मीकांत देशमुख एक गंभीर समाजनिष्ठ चित्रकार होत. केवळ ललित लिहिणे ही त्याची प्रकृती नव्हे. समाजहितैषी लेखनाचा ध्यास घेऊन अवतरणारे त्यांचे साहित्य एकविसाव्या शतकातील नव्या कथा प्रवाहाचे प्रतिनिधित्व करत आपल्या वेगळेपणाची मुद्रा मराठी कथेवर उमटविते. मराठी कथेच्या प्रांगणात क्रीडा विश्व चित्रित करून त्यांनी नवे पण रुजवले आहे. या कथा वाचताना कला व जीवन दोन्ही अंगांनी त्या आपणास भरपूर देऊन जातात. शिवाय त्यातून मिळणारे मौलिकतेचे आश्वासन त्यातला अस्सलपणा सिद्ध करत नव्या प्रवाहाच्या पाऊलखुणा उमटविते. म्हणून नंबर वन' कथासंग्रह नव्या पिढीसाठी नवे क्षितिज दाखवणारा अभिनव नंदादीप वाटतो.


• नंबर वन (कथासंग्रह)

 लेखक - लक्ष्मीकांत देशमुख
 प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद

 पृष्ठे - १६0   किंमत - १७५

♦♦

वेचलेली फुले/१६२