पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/165

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पवार यांनी कोल्हापूरचे शिल्पकार, मराठा शिक्षण परिषद, ब्राह्मणेत्तर पक्ष, सत्यशोधक समाजाची पुनर्बाधणी अशा विविध मार्गांनी चरित्र नायकाचे जीवनकार्य रेखाटले आहे.

 रावबहादूर डॉ. पी. सी. पाटील हे शेतकी कॉलेजचे पहिले भारतीय प्राचार्य, डॉ. मॅन यांच्याबरोबर त्यांनी कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले स्मारक उभारले व तेही प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते. हे कार्य त्यांना ‘रावबहादूर' ठरविण्यास पुरेसे आहे. प्राचार्य डॉ. विलासराव पवार यांच्या लेखणीतून साकारलेले हे चरित्र मनोज्ञ आहे.

 प्रजा परिषदेचे संस्थापक, स्वातंत्र्यसैनिक, चित्रकार, संपादक, नेते असे बहमुखी व्यक्तिमत्त्व लाभलेले भाई माधवराव बागल यांनी कोल्हापूरच्या सामाजिक व धार्मिक चळवळीची पताका सतत खांद्यावर मिरवली. महालक्ष्मी मंदिर सर्व जातीधर्मीयांसाठी खुले करणे, सत्यशोधक समाजाचा कार्यविस्तार, कामगार चळवळ, प्रजा परिषदेचे कार्य, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, शेतकरी कामगार पक्षाचे कार्य आणि पत्रकारिता या क्षेत्राच्या माध्यमातून बागल यांनी कोल्हापूरची लढाऊ प्रतिमा तयार केली. प्रा. डॉ. पी. एन. शिंदे यांच्या लेखणीने हा नायक समर्थपणे पेलला आहे.

 राजाराम कॉलेजचे प्राचार्यपद १८ वर्षे सांभाळत डॉ. बाळकृष्ण यांनी सर्वप्रथम शिवाजी विद्यापीठाचे प्रारूप समाजापुढे ठेवले. आर्य समाजाद्वारे शिक्षण संस्था, मोफत शाळा, हिंदी विद्यालय, वंचितांना शिक्षणाची संधी, शिवचरित्र लेखन अशा विविध कार्याद्वारे डॉ. बाळकृष्ण यांनी वंचित वर्गाला समाजाच्या प्रवाहात आणण्याचे क्रांतिकारी कार्य केले. डॉ. केशव हरेल यांनी बाळकृष्णांची शिक्षण व समाजविकासाप्रती असलेली अविचल निष्ठा शब्दबद्ध करून नवा इतिहास वाचकांसमोर आणला आहे.

 डॉ. बाळकृष्ण, कुलगुरु डॉ. आप्पासाहेब पवार व पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक या तिघांचीही चरित्रे प्रकाशित करून कोल्हापूरच्या शैक्षणिक विकासाचा आलेख या चरित्रातून उभा करण्यात आला आहे. जे पी. नाईक हे कोल्हापूरचे सुपुत्र. कोल्हापूरचे पहिले नगररचनाकार म्हणून विकासात त्यांचा सिंहाचा वाटा. गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठाच्या उभारणीत त्यांनी मोठी भूमिका बजावली. शिक्षण सर्वांसाठी हा विचार त्यांनी कोठारी आयोगाचे सचिव म्हणून काम करताना मांडला. भारतीय शिक्षणाचे जे प्रारूप त्यांनी तयार केले त्याची नोंद युनेस्कोने ‘थिंकर्स ऑन एज्युकेशन' अशी घेतली. त्याचे कार्य कर्तृत्व कोल्हापूरसाठी ललामभूत असेच आहे. प्राचार्य डॉ. जयंत कळके व

वेचलेली फुले/१६४