क्रीडा खात्यातील एक निवृत्त कर्मचारी पण बॅडमिंटनवेडा. निवृत्त झाला तरी खेळाचे वेड त्याची पाठ सोडत नाही. सरकारी खात्यात अशी चार-दोन ध्येयवेडी माणसे असतात... ती खाती ओढत असतात... शांताराम त्यांचा प्रतिनिधी... खात्यातील सेवेतून निवृत्त पण कर्तव्य प्रवृत्तता त्याला कॉमनवेल्थच्या स्टेडियमवरील बॅडमिंटन कोर्टवर न चुकता घेऊन येत असते... मध्ये तो सुट्टीवर जातो ते परत येऊन सर्व काही पाहायचे आश्वासन देऊन. दरम्यान त्याचा मधुमेह बळावतो. एक पाय अँप्युट करावा लागतो. जखम बरी होताच स्वारी वॉकर घेऊन बॅडमिंटन कोर्टवर दत्त... हे असते खेळाचे वेड. पण आपण आता कृत्रिम पाय जोडले तरी बॅडमिंटन खेळू शकणार नाही या धक्क्याने पुरता खचतो, कोसळतो... त्याच्यात उभारी, उमेद यावी, म्हणून त्याचा सहकारी गिरीश प्रधान त्याला अपंग क्रीडा स्पर्धेत नेतो. शांतारामच्या लक्षात येते,आपण तर जीवनाच्या उत्तरायणात अपंग झालो... ही अश्राप मुले तर जन्मतः अपंग आहेत... उभे आयुष्य अपंगत्व घेऊन जगणार आहेत... मग तो सावरतो नि चक्क बॅडमिंटन खेळू लागतो... ही प्रेरक कथा प्रत्येकाने मुळातूनच वाचायला हवी. नंबर वन' ही अशीच रोमहर्षक, तितकीच मनस्वी कथा! मोनिका (सेलेस) विंबल्डनवर आपली हकमत एकावर एक सेट्स, अँडस्लॅम्स होऊन सिद्ध करते तसा सुझानचा न्यूनगंड वाढीस लागतो. पण नंबर वन' होण्याचं स्वप्न तिला झोपू देत नाही. तिचा प्रियकर असलेल्या हरमनच्या हे लक्षात यायला वेळ लागत नाही की जोवर मोनिकाचे पाय विंबल्डनच्या ग्रास कोर्टवर थिरकत राहतील तोवर सुझानचे विंबल्डन सम्राज्ञी बनणे, विंबल्डनच्या बॉल रुममध्ये सेलिब्रेशन डान्सचा मान मिळण अशक्य. तो सुझानच्या प्रेमाने आंधळा होऊन मोनिकावर जीवघेणा हल्ला करून तिला जायबंदी तर करतोच, पण विंबल्डन फायनलपासून वंचितही! सुझान विंबल्डन विजेती होती, पण तो विजय कलंकित असतो... षड्यंत्रामुळेही व आपली बहीण मेरीच्या तगमग नि चडफडाटामुळेही! विजयी चंद्र कधी कधी ग्रहणाची सावली घेऊन आला की ते शरदाचे चांदणे असले, तरी पिठूर पौर्णिमेचे तेज त्यात येतच नसतं मुळी!
क्रीडांगण नि मृगजळ यात ब-याचदा मोठे साम्य आढळते. त्यातही रनिंगमध्ये तर अधिक! ‘फिरूनी जन्मेन मी’ आणि ‘रन बेबी रन' कथा याचीच प्रचिती देतात. ‘फिरूनी जन्मेन मी'ची नायिका मीना पाथरवट समाजातली. भटकं बालपण लाभलेल्या मीनाला जीव मुठीत घेऊन पळायचा घोर लागला तो काही तरी व्हायचे स्वप्न मिळाल्यामुळे. त्याचे असे झाले की मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील आपल्या छोट्या वाडी वस्तीवरून ती रोज मैत्रिणींबरोबर शाळेस जायची. एकदा नेहमीप्रमाणे शाळेस जाताना अचानक तिला ठेच