पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/161

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लागते... अंगठा फुटतो... दफ्तर पडते... मागून येणारा शिवा पारधी ते घेऊन पसार होतो... मुली, मैत्रिणी ‘‘चोर चोर' म्हणून एकच गलका करतात. मीना भानावर येऊन तशा जखमी अवस्थेत पाठलाग करून पकडते. तो सराईत गुन्हेगार असतो. अनेक चोऱ्या उघडकीस येतात. त्याक्षणी कलेक्टर डॉ. विद्या योगायोगाने पोहोचतात. कौतुक करताना म्हणतात, "She will be a great runner-Athlet. A true inter national long distance runner." कलेक्टर बाईंचे प्रोत्साहन सुरेश बाबू कोचचे मार्गदर्शन यामुळे खरेच ती पुणे, दोहा, सेऊल येथील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्य ठरते. तिचं शौर्य, पराक्रम पुरुषांना लाजवणारा ठरतो नि सानियाला तिचे गुपित कळते. ती ऑलिंपिक क्वालिफाय होण्यापूर्वी तिची लिंग परीक्षा केली जाते... ठरते की मीना नाही, मर्द सिंह आहे... इथे ख-या कथेस प्रारंभ होतो... संपूर्ण कथा खेळाडूतील ईर्षा, वैर, राजकारण, समलिंगी संबंध, बायोसेक्युअॅलिटी, हार्मोनल डिस्ऑर्डर अशा अनेक आवर्तनातून खेळाचे अचंबित करणारे जग असे उभे करते की खेळाचे जग या ग्रहावरचं असूनही परग्रहासारखे चकित करून सोडते. 'रन बेबी रन' ची नायिका बेबी ही प्रतिकूल परिस्थितीतून धावपटू होत, गुरुंच्या प्रेमात पडते... ते एकतर्फी की उभयपक्षी कळण्यापूर्वीच तिचे बालाजीशी लग्न होतं. तिला धावण्यामागे धावायचे असते तर नव-याला ती केवळ बाळयंत्र म्हणून हवी असते... मीना जशी हताश होऊन ‘फिरूनी जन्मेन मी' मध्ये विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करते तशीच बेबी जाळून घेते... मीना वाचते, बेबी दगावते. अशा भिन्न कथांतून लक्ष्मीकांत देशमुख जीवनाचा ऊन पावसाचा खेळ मांडत राहतात. प्रसंग, व्यक्ती, घटना, बारकाव्यांमुळे प्रत्येक कथा नवं जग दाखवून जाते.

 शूटिंग नि स्वीमिंगवर कथा बेतून लेखकाने खेळाचे हे रिंगण रुंदावण्याचा प्रयत्न केला आहे. यातली ‘शार्प शूटर' कथा मेलो डॅमॅटिक म्हणावी लागेल. मुंबई दंगलीच्या (२००६-०७) पार्श्वभूमीवरील या कथेतील नायक व खलनायक एकच असलेला दाऊद कुरेशी ‘डी’ कंपनीचा शार्प शूटर असतो. त्याच्या हातून देवनाथ सोळंकी नावाचा तरुण मारला जातो. पोलीस दाऊदला जेरबंद करतात. देवनाथच्या जागी दाऊदला मृत घोषित करतात. दाऊदवर प्लॅस्टिक सर्जरी करून त्याला देवनाथ करतात. या जन्मांतरातून त्यांना ए.सी.पी. थोरातना दाऊदची बिंगे फोडायची असतात. त्याला ते ऑलिंपिक शूटर बनवून प्रेस समोर आणतात. त्यात सारे गुपित सांगतात... मोठा चक्रव्यूह पेलू न शकल्याने पसरट झालेली ही कथा कलात्मक होण्याची शक्यता असताही सामान्य बनून राहते. ‘प्रयासे जिंकी मना’ जलतरणपटूच्या जीवनावरील असल्याने पाण्याचा

वेचलेली फुले/१६०