कादंबरीकारास त्या कथेतून माणसाचा जन्म आणि जगणं समजावयाचे आहे. त्या अर्थाने ही हेतूगर्भ कादंबरी होय. जगण्याचा शोध घेत माणसाच्या मनात दुसयाबद्दल समभाव जागणवणारी, कोणी औरस-अनौरस असतच नाही मुळी, माणसाचे औरस अनौरसपण साक्षेप आहे म्हणत ही कादंबरी समाजाच्या तथाकथित सोज्वळता, सभ्यता, संभावितपणाचा बुरखा फाडते. हे या कादंबरीचं योगदान होय.
‘रस-अनौरस' कादंबरीत राजन खान यांनी रचलेली नि रंगवलेली सारी पात्रे कौटुंबिक आहेत. कादंबरीचा सारा प्रदेशही पारिवारिकच. कुटुंब, पात्रं वेगवेगळी खरी, पण साच्यांचे संबंध ताण-तणाव, संवाद, व्यवहार कौटुंबिक. कौटुंबिक प्रश्नांतून राजन खान समाजसमस्येचे शरसंधान करतात. पात्रांची भाषा मध्यवर्गीय. काही पात्रं निम्नवर्गीयही आहेत. तिरळ्या, किडकी इ. त्यांच्या नावातून अशा लोकांकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन राजन खान अप्रत्यक्षरित्या अधोरेखित करतात. कादंबरीतील प्रकाशक वगळता सारी पात्रं अनौरस, विवाहपूर्व नि विवाहबाह्य संबंधाच्या फे-यात अडकलेली, लेखकाने त्यांना असे हेतुतः अडकवलंय. सर्वसामान्य वाचकांना प्रश्न पडेल की या अचाट घरातले सर्व असे अनौरस, अनैतिक कसे? कादंबरीकारास पारंपरिक समाजधारणेसच धक्का द्यायचा आहे. त्याच्या लेखी कोणी रस-अनौरस नाही, सारी मनुष्यनामक प्राण्याच्या फुकटात मिळालेल्या शुक्रजंतूची औलाद होय.
कादंबरीचा नायक आज म्हातारा आजोबा असला, तरी तो मुळात अनाथ, अनौरस आहे. त्याचे जगणे आपल्या जन्माचा शोध घेणं नि वाचकांना ते समजावणे आहे. प्रकाशक या समाजव्यवस्थेचा एक मूक, तटस्थ निरीक्षक आहे. तो क्रिकेटमधील थर्ड अंपायरसारखा आहे. मात्र तो निर्णय नाही करत, तो एक सजग, संवेदनशील समाज साक्षी आहे. कादंबरीचा नायक म्हातारा खडूस असला तरी मुळात तो बुलंद आहे. त्याच्या जगण्याला स्वनिर्मित तत्त्वज्ञान नि अधिष्ठान आहे. तो कुणाची करुणा नाही भाकत. पण सतत कुटुंबाचा करुणाकल्पतरू बनून अजानवृक्षासारखा सर्वसमावेशी, पूर्वजांच्या उदारपणाचे संचित ल्यालेला एक अलिप्त योगी आहे. त्याची जगण्याची आपली अशी अनाथ शैली आहे; तसंच जीवन जगण्याचे जगावेगळे तत्त्वज्ञानही. त्याचा जन्म जरी अनाथ असला तरी जगणे अनाथ नाही. दत्तक आई-वडील, बायको, मुलगा, सून, नातू, पणतू असं भरलेले त्याचं घर आहे. यातले सख्खे असे त्याचे कोणीच नाही. पण ती त्याची माणसे आहेत. त्यांच्या आधारावरच त्याचे अनाथ आयुष्य धकत राहिले. त्याने स्वत:ला त्यांच्यासाठी वापरू दिले. माणसाने आपल्याला दुसऱ्यांसाठी वापरू दिले की मग ते प्रेम होते.
ही कादंबरी एक नवे तत्त्वज्ञान घेऊन येते. ती तुम्हाला बुचकळ्यात