पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाडते. विचार करायला भाग पाडते हेच या कादंबरीचे यश होय. ती सांगते, की माणसाचं बीज कधीच अनौरस असत नाही. औरस, अनौरस या मनुष्यनिर्मित कल्पना आहेत. यातूनच एकाला हीणकस ठरवलं जातं तर दुस-याला सरस, औरस. रस-अनौरस' असं काही असत नाही. ती मात्र एक शुक्रजंतूची अवलाद असते. या कादंबरीचा हेतूच मुळात माणसांपर्यंत समभाव जागणवे आहे नि त्यात कादंबरीकार यशस्वी झाला आहे.

 ‘रस-अनौरस'मध्ये प्रसंगानुरूप प्रेम, पुण्य, वात्सल्य आहे पण कुठे कटुता, दुरावा नाही. नायकास सगळे वापरून फेकून जातात. तो मात्र वडासारखा आपल्या जीवनपारंब्यांना असे झोकून देतो की ज्याला हवं त्यांनी हवं तसं झुलावं. ना खंत ना खेद असे स्थितप्रज्ञ जीवन धारण करणारा म्हातारा एकविसाव्या शतकातील ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा' सारख्या ‘यूज अँड थ्रो' ला सशक्त पर्याय आहे. त्याचे अनुकरण अवघड असले, तरी अशक्त खचितच नाही. रस-अनौरस' कादंबरी जागतिकीकरण, बाजारवाद, भौतिकवाद यांच्या पार्श्वभूमीवर मानव संस्कृतीला दिलेला नवा उदारमतवाद आहे.

 राजन खान यांचे पात्र, प्रवेश, दृश्यचित्रण, अनवट, तशी भाषाही, ते चपखल शब्दप्रयोग करून आपल्या भाषेचा नवा बाज नि घाट स्पष्ट करतात. धकत, झिप्रट, टारलसारखे शब्द नवे घडवलेले असले तरी ते प्रसंगोचित व आशयगर्भ आहेत. अशीच आशयगर्भता शांताराम पवार यांच्या मुखपृष्ठात असली तरी त्यातलं थेटपण निर्भीड म्हणावे लागेल. लेखक व चित्रकारात असं अद्वैत अपवादाने आढळते. कादंबरीचा विषय मराठी वाचकांना नवा नाही. ‘पोरके दिवस, ‘बनपटाची चौकट', 'खाली जमीन, वर आकाश' मधून तो कधी थेट, तर कधी अप्रत्यक्षपणे आला आहे. मराठीतील वंचित साहित्य ललित कृतीने समृद्ध करण्याच्या अंगांनी पाहता या कादंबरीचे महत्त्व आहे. मागे माधव कोंडविलकर यांच्या अनाथ' कादंबरीनं, तर शरणकुमार लिंबाळेच्या ‘अक्करमाशी'ने या विषयाचा वेध घेतला आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळेच्या ‘विवाहबाह्य संबंधः नवीन दृष्टिकोन' मध्ये त्याची सर्वांगीण चिकित्साही झाली आहे. ‘खाली जमीन वर आकाश' सारख्या आत्मकथेतून मी या प्रश्नास फोडलेली वाचा राजन खान यांनी अधिक टोकदारपणे अधोरेखित केली आहे.


• रस अनौरस (कांदबरी)

 लेखक - राजन खान
 प्रकाशक - अक्षर प्रकाशन, मुंबई
 प्रकाशन वर्ष - डिसेंबर २००९

 पृष्ठे - २२८  किंमत - २२५ रुपये.
वेचलेली फुले/१४३