पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ‘रस अनौरस : वंचित जीवनाची कांदबरी


 ‘‘अब्जावधी शुक्रजंतू वापरून वाया जातात, त्यातला चुकून एखादा लागू पडतो आणि माणूस जन्म घेतो, इतका माणसाचा जन्म दुर्मीळ आणि मोलाचा आहे. पुन्हा जगणेसुद्धा पुन:पुन्हा मिळणारी गोष्ट नाही. ते एकदाच मिळते आणि माणूस मेला की संपतेच. पुन्हा जन्म नाही. जन्म आणि जगणे यांचे मोल सगळ्यांनाच माहीत आहे. तरीही माणसे दुस-या माणसाच्या जन्माला आणि जगण्यालासुद्धा हीणकस कसे ठरवतात? स्वत:पेक्षा गौण का मानतात? माणसाला माणसाच्याच नजरेत माणूस म्हणून दुर्मिळतेची किंमत का नाही ? माणसाच्या विचारात दुस-या माणसांबद्दल समभाव का नाही? सगळ्याच्या सगळ्या जर निसर्गाने फुकटात दिलेल्या शुक्रजंतूच्या अवलादी असतील, तर माणूस माणसात सरस निरस कसे करू शकतो? यांसारखे प्रश्न विचारून सामान्य वाचकांना भंडावून सोडणा-या राजन खान यांच्या ‘रस-अनौरस' या कादंबरीने आपल्या मलपृष्ठावरील उपरोक्त मजकुराने मला तिच्याकडे आकर्षित केले.

 एक निपुत्रिक जोडपे असते. आपल्या जीवनातील पुत्रप्राप्तीची अपेक्षा एका अनाथ, अनौरस मुलास सांभाळून भरून काढण्याचे प्रयत्न करते. प्रसंगपरत्वे आपल्या या सामाजिक कार्याचा टेंभाही मिरवते. मुलगा मोठा होतो. विवाहित होतो. त्याची बायको कुणाचा तरी असाचा अनाथ, अनौरस मुलगा घेऊन येते. दोघे त्याचा सांभाळ करतात. तो मुलगाही मोठा होतो. तो बाई घेऊन येतो. ती कुणाकडून तरी गरोदर राहते. मुलीला जन्म देते नि भूमिगत होते. नात आणि आजोबा एकत्र राहतात. एव्हाना अन्य सारे कारणपरत्वे काळाच्या ओघात घर सोडून निघून गेलेले असतात. पुढे ही नात मोठी होते. प्रियकराबरोबर पळून जाते. परत येते ती मुलाला घेऊन. आजोबा, नात, पणतू सर्वजण अनाथ, अनौरस असलेले. कादंबरीकाराच्याच शब्दांत सांगायचे तर म्हाता-याचे घरच असे अचाट! त्याची ही कथा.

 ही कल्पनातीत कथा राजन खान यांनी फ्लॅश बॅक शैलीने सादर केली आहे. म्हातारा लेखक आहे. प्रकाशकाला तो आपली कथाच नाही सांगत, तर आपला जन्म, जगणे, जगण्यामागच्या जाणिवा, कळलेले जीवन समजावतो.

वेचलेली फुले/१४१