'पालातील माणसं' : फिरस्ती जीवनाचे आत्मकथन
आजचे मराठी साहित्य अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत पाहिले तर ते अधिक अनुभवजन्य आणि वस्तुनिष्ठ जीवन चित्रण करणारे दिसून येते. त्याचे मुख्य कारण या साहित्यातील आत्मकथेचा सशक्त प्रवाह. पूर्वी आत्मकथा या आत्मसमर्थनार्थ लिहिल्या जायच्या. या आत्मनिष्ठेस छेद दिला तो दलित आत्मकथांनी. त्यात आत्मनिष्ठा असली तरी पार्श्वभागी असलेल्या समाजवेदनांचे सामूहिक प्रभावळीचे महत्त्व त्यामुळे अधोरेखित झाले. 'बलुतं', 'उपरा', ‘उचल्या', 'कोल्हाट्याचं पोर', 'गबाळ'सारख्या आत्मकथांनी ते मराठी साहित्यात ठळक केलं.
दलित साहित्याला ‘समूहकेंद्रित करणारे नि एका अर्थाने दलित साहित्यात नवी वाट मळणारे अनुभवसंपन्न पुस्तक म्हणजे पालातील माणसं'. ‘तीन दगडांची चूल मांडणाच्या विमल दादासाहेब मोरेंनी ते लिहिले आहे. या पुस्तकाचा बाज काही और आहे खरा. ते आत्मकथन असलं तरी रूढ अर्थाचे नाही. नंदीबैलवाले, गोसावी, घिसाडी, मांग-गारूडी, रामकोंडाडी, डवरी, फासेपारधी, गोपाळ, कोल्हाटी, वैदू, डोंबारी अशा दहा भटक्या जमातीतील स्त्रियांचे ते सामूहिक आत्मकथन आहे. यास ‘सामूहिक अनुकथन' म्हणणे अधिक उचित होईल. आपली ‘तीन दगडांची चूल मांडून झाल्यावर आपल्यासारख्या इतर भटक्या जमातीतील स्त्रियांच्या तीन दगडांच्या चुली कशा आहेत, हे जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून विमल मोरेंनी महाराष्ट्र, कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांतील भटक्या जमातींची पाले पाय तुडवत शोधली. तेथील स्त्रियांना 'मी तुमच्यातलीच आहे' असे सांगून पटवून देऊन विश्वास निर्माण केला. त्यांना बोलते केले. त्यांची खदखद त्यांच्याच भाषेत उद्धृत केली. त्यातून साकारलेले हे पुस्तक दहा वेगवेगळ्या भटक्या जमातीतील स्त्रियांचं अरण्यरुदन होय.
‘पालातील माणसं' वाचत असताना क्षणाक्षणाला त्यांचे माणूस नावाचे जीवन माणूस जातीला काळोख फासणारे असते, हे हळूहळू लक्षात येते. हेही लक्षात येते की स्वातंत्र्याच्या ६० वर्षांच्या वाटचालीत आपण यांच्या जगण्यात