Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोणतंही स्थित्यंतर, परिवर्तन आणू शकलो नाही. पालात स्त्री असणे आयुष्याचा पालापाचोळा होणे असते. ती स्त्री नसते. ती तेथील पुरुषांच्या लेखी एक रांड, रखेल नि हक्काची खरेदी केलेली गुलाम असते. शिव्यांची आरती हाच तिचा असतो उद्धार. ती विकत घेतली जाते नि विकत घेतल्याच्या गुर्मीत तिला नागवले जाते, ती आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संशयाच्या अग्निरेषेवर अग्निपरीक्षेसाठी सदैव तत्पर, साधे पालात लाल मुंग्या लागल्या तरी तिला तिचे मळभ उठलेले चारित्र्य प्रायश्चित्ताने सिद्ध करावे लागते. रोजच्या जेवणात थेंबभर गोडेतेल न वापरणाच्या या जमाती स्त्री चारित्र्याच्या शुद्धतेच्या सत्त्वपरीक्षेसाठी मात्र किलोभर तेल आणतात. उकळतात नि त्यातला पैसा काढायला लावतात. लग्न रात्री तर जुन्या कपड्यावरच पाठ लावली जाते. जुने कपडे चोरीचे, दुसरे मिळेपर्यंत पुरवावेच लागतात. सकाळचे जेवण मागून आणलेल्या तुकड्यांवर. ते मिळविण्यासाठी सूर्योदयापूर्वी उंबरे झिजवायचे. उशीर झाला तर सभ्य समाजातली सुशिक्षित, स्थिरावलेली, सुसंस्कृत माणसे शिळं पाकं सूर्योदयानंतर जनावरांच्या मुखात घालतात म्हणून या स्त्रियांनी जीव पणाला लावत आकांतानी वस्त्या, गावे पायी तुडवायची. रात्री तर्र होऊन आलेल्या पुरुषांच्या वासनेला यांनी हक्काने नेमाने बळीच पडायचे. रात्री वस्तीवर दिवा नसतो, कारण पोलीस संशयित म्हणून रोज छापे टाकतात. पोलिसांचे कुत्र्यासारखे लचके तोडणे, अंगाला झोंबणे, अवघड जागी मारणे, बाव-याला वाचवण्यासाठी या बायकांचे किडूक मिडूक विकणे रोजचे! देखणेपणाचा शाप असणारी पालातील स्त्री तीच. पाय घसरला की तिला बहिष्कृतच व्हावे लागते. जित्यापणी तिचे दिस घालणारी पालं स्त्रीपणाचे नवे पालाण तुमच्यापुढे उभे करते. वाचक निःस्तब्ध होतो तो स्वत:स माणूस म्हणवून घेण्याच्या खोट्या प्रतिष्ठेमुळे!

 ‘पालातील माणसं' भटक्या जमातीचा समाजशास्त्रीय, मानवंशशास्त्रीय लोकसंस्कृतीचा दस्तऐवज जसा आहे तसं ते एक दलित साहित्यातले ललितही! या पुस्तकात दहा भटक्या जमातीतील स्त्रियांचे जगणे-मरणे समजते. ते समजून घ्यायला मोठी हिंमत लागते खरी. या साच्या जमाती पूर्वी जंगलात राहायच्या. जगायच्या. जंगलातील कंदमुळे, जनावरे हाच त्यांच्या जगण्याचा आधार. माणसाने जंगले उद्ध्वस्त केली. यांच्या जगण्याचे आधार असलेली जनावरं नामशेष होत गेली. निसर्ग ओरबडला. पर्यावरण उद्ध्वस्त झाले. तसे यांचे पारधीपण अपारधी आणि अपराधी झाले. मग माणूस नावाच्या तथाकथित सभ्य समाजावरचा त्यांचा भरवसा उठला. ते रामभरोसे झाले. काळूबाई,

वेचलेली फुले/१३०