वैचारिक असहिष्णुतेचा उतरता आलेख : ‘भारताचा अंत
ब-याच दिवसांनी अस्वस्थ करणारे एक पुस्तक हाती लागले. या पुस्तकातील लेखात मती गुंग करण्याची विलक्षण ताकद असल्याने ते हातासरशी वाचून संपवले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या गेल्या छप्पन्न वर्षांच्या प्रवासात देशाची चिंता करणारे विचारक नेहमी इशारा देत होते की, 'देश विभाजनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आता तर ते चक्क घोषणा करते झालेत की, ‘भारताचा आता अंत झाला आहे, तरी आपण अस्वस्थ होत नाही याला काय म्हणावे? भारतातील लक्षावधी लोक निःस्वार्थी आहेत, पण ते संघटितांच्या पुढे निष्प्रभही ठरत आहेत. आपल्यात एकजूट नसल्याने त्यांना जाब विचारायची हिम्मत आपल्यात नाही असे भान देणारे, भानावर आणणारे हे पुस्तक. पुस्तकाचे नाव आहे ‘भारताचा अंत' लेखक आहेत खुशवंत सिंग ‘एण्ड ऑफ इंडिया' या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. मराठीतील प्रथितयश अनुवादक चंद्रशेखर मुरगूडकर यांनी मोठ्या ताकदीने हा अनुवाद करून अनुवादित मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. भारताचा अंत' हे पुस्तक लेखसंग्रह होय. शीर्षकापासूनच ते वाचकांची पकड घेते. चंद्रमोहन कुलकर्णीचे लक्षवेधी, गंभीर, सूचक मुखपृष्ठ या पुस्तकाची आणखी एक जमेची बाजू. चिनार प्रकाशन, पुणे यांनी अलीकडे प्रसिद्ध इंग्रजी रचनांचे मराठी अनुवाद देण्याचा जो सपाटा लावला आहे त्यातील हा एक मोठा झपाटा. पुस्तकांतील ‘ओळख' ते ‘यावर काही उपाय आहे का?' शीर्षकातील पाच लेखात ते भारतातील वैचारिक असहिष्णुतेचा उतरता आलेख स्पष्ट करतात खुशवंत सिंग हे पत्रकार, संपादक, स्तंभलेखक होते. त्यांना भारताच्या इतिहासाचे चांगले ज्ञान आहे. घटनांचे विश्लेषण करण्याची वृत्ती त्यांच्यात आहे. त्यामुळे भविष्यवेध घेण्याचे कौशल्य त्यांच्यात विकसित न होते तरच आश्चर्यः ‘भारताचा अंत' हा लेखसंग्रह एका अर्थाने भारताच्या राजकीय, धार्मिक, जातीय संस्था, पक्ष, संघटनांच्या कार्याचे केलेले तटस्थ मूल्यांकन होय. देश स्वतंत्र झाला तेव्हा तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक धोका डाव्या विचारसरणीचा वाटायचा पण नेहरू जाणून होते की, भारतीय