पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व तो पोलिसी अत्याचारांची शिकार होतो. पोलीस अण्णाजीस नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा बळी म्हणून घोषित करून नामानिराळे होतात. ते पोलीस कोठडीत कृष्णप्पाचा अनन्वित छळ करतात. केवळ महेश्वरय्यांच्या पुण्याईने त्याची सुटका होते. बाहेर येऊन तो रयत संघटनेचे नेतृत्व करतो. आमदार, खासदार होतो. शेतक-यांच्या भल्यांसाठी कुळकायदा करण्यास सरकारला भाग पाडतो. त्यामुळे त्याला व्यापक जनमताचा पाठिंबा मिळतो व तो सर्वमान्य नेता बनतो.

 त्याचे नेतृत्व शिगेला पोहोचले असतानाच तो पक्षाघाताचा बळी ठरतो. तरीही त्याच्या लोकप्रियतेत तसूभरसुद्धा घट होत नाही. उलटपक्षी त्याच्या सर्वमान्यतेमुळे व पक्षफुटीच्या तोंडावर तो संभाव्य मुख्यमंत्री म्हणून राज्याची पहिली पसंती मिळवितो; पण व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनातील क्षुद्रता त्याला शिसारी आणते व लोकनेतेपदाचा राजीनामा देऊन राजकीय निवृत्ती, विजनवास पत्करतो.

 अवस्था ही कादंबरी व्यक्ती, राजकारण, चळवळ, सार्वजनिक व्यवहार यांच्या स्वातंत्र्योत्तरकालीन पहिल्या पंचवीस वर्षांची वजाबाकी सांगणारी आहे. ऐन उभारीत धडाडी, धडपडीतून फुललेली अनेक ध्येयवादी मंडळी जीवनसूर्य डोक्यावर तळपत असताना क्षुद्रतेचे बळी ठरतात. ज्या तत्त्वांची त्यांनी आयुष्यभर पाठराखण केलेली असते त्याकडे सोईस्कर डोळेझाक ही त्यांची मजबुरी ठरते. कारण त्यांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात महदंतर असते खरे. कथा कर्नाटकाची असली, तरी ती भारतीय राजकीय व सामाजिक जीवनाची प्रातिनिधिक म्हणून वाचकांसमोर येते. ती अधिक भावते. कारण वास्तवाशी तिचे जवळचे नाते वाटते.

 स्त्री-पुरुष संबंध, क्रांतिकारी चळवळ, नक्षलवादी घटना, आध्यात्म, खेड्यातील जनजीवन इत्यादी माध्यमांतून अनेक विषयांचे, समस्यांचे चित्रण करणारी ही कादंबरी म्हणजे अनंतमूर्तीच्या वर्णनकौशल्याची सुंदर प्रचिती देणारी कृती. 'संस्कार'प्रमाणेच ही कादंबरीपण पात्रचित्रण, भाषा, शैली, उद्देश इत्यादी अनेक अंगांनी सरस ठरली आहे. स्वातंत्र्योत्तर राजकारणी व राजकारणाचे हुबेहूब वर्णन करणारी ही कादंबरी वाचकांना आपल्या परिसरातील राजकारण्यांशी व राजकारणाशी मेळ घालण्यास भाग पाडते. हे लेखकाच्या लेखणीचे श्रेय. फॅसिस्ट' नि फ्युडल' यांच्या संघर्षात दोघांचेही पाय मातीचेच असल्याची खात्री देणारी ही कादंबरी. वर्गसंघर्ष, वर्गहिताच्या गप्पा मारणारे पुढारी, त्यांनी

वेचलेली फुले/१0६