Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘अवस्था' : स्वातंत्र्योत्तर दूरवस्थेचे चित्रण


 कन्नड कथासाहित्यात यू. आर. अनंतमूर्तीचे एक वेगळे स्थान आहे. स्वातंत्र्योत्तर काळात कन्नड कादंबरीत नवा प्रवाह निर्माण करणाच्या यशवंत चित्ताल, डॉ. शांतीनाथ देसाई, गिरी, पी.लंकेश, कुसुमाकर, पूर्णचंद्र तेजस्वी, एस. एल. भैरप्पा यांच्याबरोबर त्यांचे नाव घेतले जाते. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच कादंबच्या अनंतमूर्तीनी लिहिल्या. त्यांत ‘संस्कार विशेष उल्लेखनीय ठरली होती. त्यानंतर, ब-याच वर्षांच्या मध्यंतरानंतर त्यांनी मूळ कन्नडमध्ये लिहिलेल्या ‘अवस्था' कादंबरीचा मराठी अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे. 'अवस्था' नावाने प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा अनुवाद वाचत असताना वाचक सरळ लेखकाशी भिडून जातो. उमा कुलकर्णी यांच्या अनुवादाचे हे वैशिष्ट्य होय की, वाचक अनुवादकाशी मध्यस्थी विसरून जातो. हेच या अनुवादाचे यश म्हणावे लागेल.

 ‘अवस्था' कर्नाटकातील सन १९४२ ते १९७२ या तीन दशकांच्या कालखंडातील राजकीय स्थित्यंतर, परिवर्तन, पक्षांतर, पक्षविभाजनाची पार्श्वभूमी लाभलेली चरित्रप्रधान कादंबरी होय. कृष्णप्पा हा कादंबरीचा नायक. तो आता पन्नाशीला येऊन ठेपला आहे. पक्षाघाताने विकलांग झालेल्या, चाकाच्या खुर्चीवर खिळलेल्या, तरीही आज विरोधी पक्षनेता, रयत संघटनेचा झुंझार पुढारी, संभाव्य मुख्यमंत्री म्हणून सर्वांना हवाहवासा वाटणारा हा नेता असा गलितगात्र स्थितीत पाहणे, त्याची ही अवस्था केवळ विकल, अस्वस्थ करणारी अवस्था. सारी कादंबरी अनंतमूर्तीनी पूर्वदीप्तीशैलीने (फ्लॅशबॅक) चित्रित केली आहे. कृष्णप्पा चाकाच्या खुर्चीवर खिळून आपला तरुण कार्यकर्ता नागेश याला आपली सारी रामकहाणी सांगतो आहे. कृष्णप्पाचा जीवनपट उलगडत जातो तसे आपणास समजते की, अत्यंत गरिबीतून वर आलेला कृष्णप्पा महेश्वरय्यांमुळे बी.ए.पर्यंत शिक्षण घेतो. तारुण्याच्या ऐन बहरात गौरी देशपांडे यांच्या प्रेमात पडतो खरा; पण त्यापेक्षा त्याला आकर्षण असते स्वातंत्र्य चळवळीचे. पुढे तो तेलंगणाच्या आंदोलनात सक्रिय असतो. अण्णाजी सारख्या नक्षलवाद्याच्या सान्निध्यात त्याच्या जीवनाची वाताहत होते

वेचलेली फुले/१०५