संस्कार, संस्कृतीचे पंचशील सुरक्षित राहणार, हे समजविणारे हे ललित लेख! सुंदर तितकेच सामाजिक भान देणारे!
‘बंजा-याचे घर' लेखिकेनी ऋणमोचन भावनेने केलेले लेखन आहे. त्यात कृतज्ञता आहे, तशी कणवही. गावाकडचे घर पहिल्या भेटीतच आपले होते. कौलारू, कृष्णवेलींनी वेढलेले. आजीच्या मायेने मंतरलेले हे मातृधर्मी घर. म्हणूनच लेखिकेला त्याचं कोण अप्रूप? घर आपले असले की, यायला निमित्त लागत नाही, ते नित्यनेमाने आपणाकडे आपल्या माणसांना ओढत राहतं. जंगलाच्या कुशीत दडलेले हे घर. या घरातली माणसेही घरासारखीच आतून बाहेरून एक. साकळलेले आयुष्य मोकळे करणारे हे घर लेखिकेला म्हणून तर आप्त, स्वकीय, आत्मीय वाटत राहते. मावशी, रखवालदार भीम, त्याची मुले, सारी कशी स्वभाव गर्द मनाने हिरवी स्वभावाने गुलमोहर, बोगनच्या फुलासारखी जर्द!
दुसरे घर लेखिकेचे गोव्यातले आजोळ, बांदोड्याचे. सभामंडप, नगारखाना, आगरशाळा, असे ऐसपैस चौसोपी. महालक्ष्मी मंदिराच्या ओव-यांनी वेढलेले. भट-भिक्षुकांच्या घरांनी घेरलेले. चिऱ्यांचा गडगा, पाण्याचे तळे...लेखिका घर सजीव करते ती शब्द वर्णनांनी नाही, तर आठवणींच्या शिंपणांनी. पोर्तुगीजी थाटाचे हे घर अगडबंब कुलूप किल्ल्यांनी पण प्राचीन असल्याच्या खुणा उठवते. उतरती कौले, अर्धगोल महिरपी दरवाजे, खिडक्या, देवळी, दगडे साच्यांनी हे घर आपणास केव्हा भूतकाळात घेऊन जाते हे कळत नाही. खेड्यातले असले तरी खानदानी कोंदणात वसलेले नि म्हणून लोभसही!
कोवाडचे घर तिसरे. स्वामीकार रणजित देसाईंचे, हेही बांदोड्यासारखेच खानदानी घर. पण याची चेहरेपट्टी वेगळी नाही म्हटले तरी कर्नाटकी मुलखाच्या सीमेवर वसलेले. या घराने लेखिकेला हरवलेले मराठीपण बहाल केले. भाषा, साहित्य, कलेचे संस्कार भरलेले घर. पायाखालची वाळू सरकलेल्या भुसभुशीत दिवसात माय मराठीबरोबर याच घरांनी सुप्त कलेचे धुमारे फुलवले. आपल्या रणजितदादांचे तुटलेपण लेखिकेने अनुभवले ते हेच घर. साऱ्या विस्कटलेल्या आयुष्याचे धागेदोरे जोडणारे हे घर. पण कसे सुन्न... मौन... ‘याद की कोई खबर लाता नहीं' असे काव्यात्मक, भावस्पर्शी शीर्षक देऊन यशोधरा भोसले यांनी एका उद्ध्वस्त जीवनाची अबोल करुण कहाणीच पेश केली आहे.
'कोलाज' हे चौथ घर, कोलाज ही एक चित्रशैली. आपल्या ठिगळ जोडीच्या आयुष्यात भेटलेल्या चित्रकार मित्राचे हे घर. मुकुंदनगर, चेंबूर, मुंबईचा परिसर ज्यांना माहिती आहे त्यांना कोलाज वाचताना लेखिकेच्या