पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पण आपला विकास झाल्यावर आपण ज्या वर्गातून प्रवास करीत तेथे आलो, त्या सहबांधवांविषयी आपल्या मनात किती सहानुभूती राहते, त्यांसाठी आपण काय करतो, याचा हिशेब कृतीतून मांडल्याशिवाय आपला विकास सिद्ध होत नाही, या विचारावर खांडेकर ठाम होते. मध्यमवर्गीयांची तटस्थता, निष्क्रियता, स्वकेंद्रितता यांबद्दल त्यांच्या मनात एक प्रकारची नाराजी असायची. ती व्यक्त करताना ते म्हणतात, “आपली भाषा, आपला धर्म, आपला वेष, आपली अंतर्मुख संस्कृती आणि या सर्वांपेक्षाही अधिक महत्त्वाचा असलेला असा अज्ञानाच्या आणि दारिद्र्याच्या पंखांत रुतलेला आपला बहुजन समाज यांकडे पाठ फिरवून इंग्रजी राज्यातील कारकुनापासून कारभाऱ्यापर्यंतची कामे इमाने इतबारे करण्यात या काळात मध्यमवर्गाची बरीचशी बुद्धी खर्च पडू लागली. नकळत या वर्गाच्या आशाआकांक्षा संकुचित झाल्या. विलास म्हणजे विकास, ज्ञान म्हणजे पोपटपंची, कार्य म्हणजे सभासंमेलनांतून ऐटीत करायची भाषणे, असली समीकरणं त्यांच्या अंगवळणी पडली. गेल्या शतकात इंग्रजी राजवटीने निर्माण केलेल्या मोहिनीने या वर्गाच्या आत्म्याला गाढ मोहनिद्रा आणली!"
पहिले प्रेम

 याच नावाने लिहिलेल्या अन् सन १९४१ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीस वि. स. खांडेकरांची ‘पार्श्वभूमी' म्हणून सुमारे ५० पानांची दीर्घ प्रस्तावना आहे. त्या कादंबरीइतकीच ती आकर्षक आहे. प्रेम हा मनुष्यजीवनाचा स्थायीभाव आहे. 'पहिले प्रेम' अविस्मरणीय असते. त्याची सर कशालाच येत नाही, हे जरी खरे असले तरी अशा प्रेमभंगाने खचणाऱ्यांची, आत्महत्या करणाऱ्यांची व जीवनभर हताशपणे जगणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पहिले प्रेम अन् आयुष्यभर मिळणारे प्रेम यांत श्रेष्ठ कोणते ? ब-याचदा या प्रश्नाचा कौल आजवरच्या कवी, चिंतक, लेखकांनी पहिल्या प्रेमाच्या बाजूने दिला असला तरी खांडेकरांना मात्र तो मान्य नाही. तरुणांची असहमती मान्य करूनही खांडेकर या कादंबरीत आपल्या धारणेवर अविचल उभे दिसतात; कारण भावना व वास्तव यांत हितकारी, चिरस्थायी काय, हे त्यांच्यातील तत्त्वचिंतकाला जीवन अनुभवातून उमगलेलं ते सत्य आहे. ते उलगडून सांगताना म्हणतात की, ‘पहिल्या प्रेमातल्या दिव्यत्वाला अथवा आभासात्मक उत्कंठतेला भुलून जाऊन आजच्या मध्यमवर्गीय तरुणाने स्वतःचे मानसिक हाल करून घेणे हा एकप्रकारचा वेडेपणा आहे. प्रेम करणे हा तरुणांचा हक्क आहे. त्याने देशावर प्रेम केले पाहिजे आणि आपल्या आवडीच्या एखाद्या मुलीवर अगर मुलावरही प्रेम केले पाहिजे,समाजात प्रेम केले पाहिजे, आपल्या कुटुंबावर प्रेम केले पाहिजे;

वि. स. खांडेकर चरित्र/९५