पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पण काळाचे शिक्कामोर्तब असले म्हणून काही कुठलाही अन्याय न्याय ठरू शकत नाही! धड पोटभर अन्न नाही, धड अंगभर वस्त्र नाही, धड मुला-बाळांना उद्या चार घास सुखाने मिळतील, अशी आशा नाही, कसलाही बौद्धिक आनंद नाही, कसलेही सुख नाही, सुखाची पुसट आशासुद्धा नाही. अशा स्थितीत पिढ्यानपिढ्या घाण्याला जुंपलेल्या बैलांप्रमाणे राबत आलेल्या या माणसांनी, आपल्या निढळाच्या घामाने मातीत मोत्याचे दाणे पिकविणाऱ्या या कष्टकऱ्यांंनी, किती दिवस राहायचे? अनंत अज्ञानाची, पशुतुल्य जीवनाची ही जबरदस्त शिक्षा त्यांना कुणी दिली? यांनी समाजाचा असा कोणता गुन्हा केला आहे? तेव्हा त्यांचा विषमतेवरील राग समजण्यासारखा असतो.
हरिजनोद्धार
 समाजातील जातीयता नष्ट व्हायची, तर वरवरच्या सुधारणा कामी येत नसतात. त्यासाठी जनमानसात आंतरिक बदल घडून येणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य असते. आगरकर, गांधींसारखे समाजसुधारक होते म्हणून हरिजनांच्या स्थितीत थोडाफार बदल घडून आला; पण या वरवरच्या बदलाने वि. स. खांडेकर समाधानी नव्हते, हे त्यांच्या या विचारांवरून सहज लक्षात येतं. 'आगरकरांसारख्या अद्वितीय पुरुषाने अट्टहास केला आणि नंतर गांधींसारख्या अलौकिक पुढाऱ्याने चंग बांधला म्हणून हरिजनांविषयी बरीचशी सहानुभूती उत्पन्न झाली आहे; पण सहानुभूती ही पाण्यासारखी आहे. उलट प्रत्यक्ष कृती हे अन्न आहे. नुसत्या पाण्यावर मनुष्य फार दिवस जगू शकत नाही. हरिजनांचीही आता तीच स्थिती झाली आहे.' वर्तमानपत्रातले लेख, सभांतली भाषणे आणि मासिकांतील गोष्टी यांवरून त्यांच्या उद्धाराविषयी समाजाला फार तळमळ लागली असे वाटते; पण आज तुकाराम असता तर हे सारे पाहून ‘बोलाची कढी, बोलाचाच भात! जेवुनिया तृप्त कोण झाला?' असा रोकडा सवाल या साऱ्या सुधारकांनी केला असता हे कोण नाकारेल?
पांढरपेशा मध्यमवर्ग

 समाज तीन वर्गात विभागला आहे, निम्न, मध्यम आणि उच्च! खालच्या वर्गातील माणसं शिक्षित होतात नि मध्यमवर्गीय बनतात. त्यांचं मध्यमवर्गीय होणं, त्यांचा भौतिक विकास असतो. शिक्षण व पैशाने माणसाचं जीवन समृद्ध होत असेल; पण सभ्य नाही. समाजसभ्यता वर्गीय जाणिवांवर उभी असते. बहुजन अभिजन होणं गैर काहीच नाही. त्याचसाठी तर असतो सारा अट्टहास!

वि. स. खांडेकर चरित्र/९४