पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण हे प्रेम परिस्थितीमुळे विफल झाले की, आपल्या आयुष्यातला सर्व रस संपला म्हणून हताश होणं हा मनाचा दुबळेपणा आहे! प्रेम आणि जीवन यांच्या परस्परसंबंधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका संकुचित असून चालणार नाही.
कामवासना
 वि. स. खांडेकरांची 'ययाति' म्हणजे भोग आणि त्यागाची द्वंद्वकथा होय. व्यापक समाजचिंतन व्यक्त करणारी कादंबरी म्हणून मराठी साहित्यात तिचे आपले असे महत्त्व आहे. मानवी जीवनातील भावभावनांचे महत्त्व ती अधोरेखित करते. मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी आणि मन हा लगाम आहे. विविध इंद्रिये हे घोडे, उपभोगाचे सर्व विषय हे त्यांचे मार्ग आणि इंद्रिय व मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोक्ता आहे... इंद्रियरूपी घोड्यांना मनाच्या लगामाचं बंधन सतत हवे... मनावर बुद्धीचे नियंत्रण हवे. बुद्धी आणि मन दोन्ही मिळून संयमाने हा रथ चालवू शकतात. या कादंबरीतील हे शेवटचे शब्द, "सुखात, दुःखात । सदैव एक गोष्ट लक्षात ठेव. काम आणि अर्थ हे महान पुरुषार्थ आहेत. मोठे प्रेरक आहत. जीवनाला पोषक असे पुरुषार्थ आहेत; पण हे स्वैर धावणारे पुरुषार्थ आहेत. हे पुरुषार्थ केव्हा अंध होतील, याचा नेम नसतो! त्यांचे लगाम अष्टौप्रहर धर्माच्या हातात ठेव." ते असे बजावतात तेव्हा ती धोक्याची घंटीच वाजवत असतात. खांडेकरांनी आपल्या समग्र साहित्यातून विविध प्रकारच्या दुष्ट तत्त्वांचा (Evils) निर्देश करीत माणसास त्यापासून मुक्त, दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. असे सल्ले त्यांच्या साहित्यात ठायीठायी विखुरलेले आहेत. माणूस सत्शील, सभ्य, मूल्यवान, नैतिक राहायचा तर त्यानं काळाची आव्हाने समजून घेऊन स्वतःला सावरत संयमानंच जगायला हवं. 'तेन त्यक्तेन भुजितः' या गीतेतील श्लोकाप्रमाणे खांडेकर त्यागासह भोगाचे महत्त्व विशद करतात.'ययाति'तून त्यांना हेच सूचित करायचं आहे की, 'वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात वासनांचे आणि विकारांचे नियंत्रण किंवा उदात्तीकरण करणारा मानव जोपर्यंत निर्माण होणार नाही, तोपर्यंत मानवतेला सुख आणि शांती यांची प्राप्ती होण्याचा संभव नाही.'
सेवा आणि सुख

 सुख ही मानवी भावना आहे. भावनेचा मूलभूत गुणधर्म असतोच मुळी अतृप्ती, असमाधान. सुखामागे धावणे म्हणजे मृगजळाचा पाठलाग करणे होय.

वि. स. खांडेकर चरित्र/९६