पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 याच्या मराठी निर्मितीची जबाबदारी भालजी पेंढारकरांवर सोपविण्यात आली होती. त्याची निर्मिती पुण्यात करण्याचे ठरले होते. मुहूर्तही ठरल्याची नोंद आहे. पण ते बारगळले. पुढे भालजींनी आपणास स्वतंत्र कथा द्यावी म्हणून केलेला गळ घालणारा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. तेही घडले नाही. त्यामागे व्यावसायिक स्पर्धा (हंस/प्रभाकर चित्र) हे कारण असावे. ‘धर्मपत्नी'च्या कथानकावर आधारित कादंबरी प्रकाशनाची तरतूद ही 'फेमस'च्या करारात आढळते. त्यासाठी वि. स. खांडेकरांना स्वतंत्र मानधनाची योजना होती. मराठी, हिंदीऐवजी हे चित्र तमिळ, तेलुगूत आले, हा विचित्र योगायोग म्हणावा लागेल.
परदेसी
 वि. स. खांडेकरांच्या चित्रपट इतिहासात सन १९५३ हे सुवर्ण वर्ष मानावे लागेल; कारण या वर्षात ‘सोनेरी सावली' (मराठी), ‘विश्वामित्र व दानापानी' (हिंदी) आणि ‘परदेसी' (तेलुगू व तमिळ) असे पाच चित्रपट प्रदर्शित झाले व तेही विविध भाषांत. या वर्षात प्रदर्शित वरील चित्रपटांमुळे खांडेकर भारतीय पटकथाकार झाले व हे सर्व चित्रपट चांगले चालले.
 ‘परदेसी' चित्रपटाची मूळ कथा वि. स. खांडेकरांची. हा मुळात तेलुगूत निर्मिलेला चित्रपट तमिळमध्ये ध्वनिमुद्रित (डब) करण्यात आला होता. 'धर्मपत्नी' (१९४१) चित्रपटाच्या धर्तीवर तो निर्माण करण्यात आला होता. हा नाट्यपट (ड्रामा फिल्म) होता. ३५ मि. मि. फिल्मवर तयार करण्यात आलेला हा मोनोपट. १९० मिनिटांचा होता. सर्वांसाठी (यू) त्याचे प्रदर्शन होते. १ जानेवारी, १९५३ रोजी तो प्रदर्शित झाला होता.

 याची पटकथा अनैतिक संबंधावर आधारित होती. हा मेलोड्रामा होता. चंद्रम त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सर्वांसमोर येतो. सर्वपरिचित होतो. आपल्या बालमित्रांच्या विधवा पत्नी व मुलास हातभार लावतो. या प्रयत्नातून त्याला नोकरी मिळते. दरम्यान एका पर्यटनस्थळी तो गेला असताना त्याची भेट लक्ष्मी नावाच्या फुलं विकणाच्या बाईशी होते. तिचे वडील जुन्या विचारांचे असतात. ते त्यांच्या प्रेमविवाहास नकार देतात. वडिलांचा विरोध न जुमानता चंद्रम व लक्ष्मी लग्न करतात, काही दिवस एकत्र राहतात नि अचानक एक दिवस चंद्रम गाव सोडून पळून जातो. लक्ष्मीला निराधार झाल्यासारखे वाटते. तिला निराधार व अनाथ पाहून तिच्या घराला काही हितशत्रू आग लावतात. ती बेघर होते. तशात तिच्यावर दावा लावला जातो. तिचं जगणे कठीण होते.

वि. स. खांडेकर चरित्र/८८