पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अरविंदच्या घरी पहिल्यांदा मंजिरीचा स्वीकार होतो; पण ती हरिजन असल्यानं तिला नाकारलं जातं. मंजिरी व अरविंद विरोध झुगारून आंतरजातीय विवाह करतात. स्वतःला हरिजनोद्धाराच्या कामात झोकून देतात.
 अशी ध्येयवादी कथा घेऊन येणाऱ्या चित्रपटास भारत व महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला आहे. ही कथा म्हणजे 'अमृत'ची सुधारित आवृत्तीच. खांडेकरांच्या पहिल्या व शेवटच्या चित्रपटास पुरस्कार लाभणे हा एक सुखद योगायोग! मीना मंगेशकर (खडीकर) या बोलपटामुळे संगीत दिग्दर्शक झाल्या. उषाकिरण व सूर्यकांतच्या त्या वेळच्या गाजलेल्या जोडीचा लाभलेला अभिनय हे या चित्रपटाचं यशाचं एक श्रेय म्हणून सांगता येईल. पी. सावळाराम यांची गीतं व संत नामदेवांच्या अभंगांनी नटलेला हा चित्रपट लता व हृदयनाथ मंगेशकरांचा गळा लाभल्यानं अधिकच प्रभावी झाला होता.
‘सूनबाई'ची निर्मल गाणी
 मराठी चित्रपटसृष्टीशी खांडेकरांचा शेवटचा दुवा म्हणून ‘सूनबाई चित्रपटाचा उल्लेख करता येईल. १९६२ मध्ये ‘सुरेल चित्र'ने तयार केलेल्या बोलपटांसाठी खांडेकरांनी गीतं लिहिली होती. त्या गीतांना सुप्रसिद्ध बंगाली संगीतकार सलील चौधरी यांनी चाली लावल्या होत्या. या चित्रपटाची कथा द. र. कवठेकरांच्या 'रुपेरी कडा' कादंबरीवर आधारित होती. यातील खांडेकरांची गाणी गाजली. भावविभोर निर्मल गाण्यांमुळे ‘सूनबाई'स मराठी प्रेक्षकांनी पसंती दिली होती.
खांडेकरांच्या हिंदी पटकथा

 वि. स. खांडेकरांच्या पटकथांवर हिंदीमध्ये 'छाया' (१९३६), ‘ज्वाला (१९३८), ‘मेरा हक' (१९३९), 'संगम' (१९४१), 'अमृत' (१९४१), ‘बड़ी माँ' (१९४५), ‘सुभद्रा' (१९४६), ‘मंदिर' (१९४८), ‘विश्वामित्र (१९५२), ‘दानापानी' (१९५३) असे तब्बल दहा चित्रपट प्रदर्शित झाले होते, हे वाचून मराठी भाषिकांना आनंद झाल्यावाचून राहणार नाही. पैकी छाया, ज्वाला, मेरा हक, संगम, अमृत, मंदिर सारखे चित्रपट मूळ मराठी पटकथांवर बेतलेले होते. पैकी काही डब होते, तर काहींची निर्मिती स्वतंत्र होती. या सर्व चित्रपटांची चर्चा (हिंदी रूपांतरासंबंधी) यापूर्वी, त्या त्या मूळ चित्रपटात करण्यात आली आहे; परंतु याशिवाय जे चार स्वतंत्र हिंदी चित्रपट राहतात, त्यांची चर्चा समग्र मूल्यांकनाच्या दृष्टीने आवश्यकच नाही तर अनिवार्य असल्याने पुढे करण्यात आली आहे.

वि. स. खांडेकर चरित्र/८२