पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/82

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ससेहोलपट होते. मुलगा बेकार, उपवर मुलीचं लग्न ठरत नाही. हे सारं पैशाअभावी होतंय, हे लक्षात आल्यावर मुलगा आनंद पेटून उठतो व मीरेचं लग्न करण्याचं ठरवितो. स्वामी नामक गुंडाशी संधान बांधून परिस्थितीवर विजय मिळवित असताना आशाच्या प्रेमात पडतो. आशा कुमारी माता होणार, हे लक्षात आल्यावर तिला घर पारखे होते. याच दरम्यान पोलीस आनंदला अटक करतात आणि मग बापू मास्तरांनी जपलेल्या मूल्यांच्या नंदादीपाचं काय होतं, याची उत्कंठा लावणारं हे कथानक.
 या चित्रपटास माधव शिंदेंचं दिग्दर्शन लाभलं. दादा साळवी, सीमा, सूर्यकांत, इंदिरा चिटणीस यांच्याबरोबर नवतारका उमाही यात अवतरली होती. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व मंगेशकर कुटुंबीय यात एकत्र येऊन गायले. यातील गीतसंगीत गाजले. या चित्रपटाने चांगला धंदा केला तरी तो फार प्रभाव दाखवू शकला नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समीक्षक, परीक्षकांनी त्याचं केलेलं स्वागत कळायला हृदयनाथ मंगेशकरांनी खांडेकरांना लिहिलेल्या पत्रातील पुढील मजकूर पुरेसा आहे... ‘चित्रपट मुंबईत उत्तम धंदा साधतोय; पण वृत्तपत्रांनी नेहमीच्या पद्धतीने आमच्यावर टीकेची झोड उठवली. आपल्याशी साहित्यिक दृष्टीने ते काही बोलू शकत नाहीत, मग बरोबरी करणे दूरच राहिले. मग चित्रपरीक्षणामध्ये तुम्हांला एक कोपरखळी मारता आली तर काय बिघडले? या न्यायाने सर्व वृत्तपत्रांनी आपापली लेखणी चालवली आहे. असल्या टीकेची मी पर्वा करत नाही आणि आपण तर करमणुकीचे एक साधन म्हणूनच असली परीक्षणे वाचत असाल. असो.'
 सोहिरोबानाथ आंबिये यांच्या ‘अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे' हा अभंग निर्माता व लेखकांनी पटकथेत वापरून मोठे औचित्य साधले आहे. त्यामुळे कथेची शिकवण प्रभावी होण्यास मोठे साहाय्य झाले आहे. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओत याची निर्मिती होत असताना शेजारच्या शाहू दयानंद मोफत मराठी शाळेत मी चौथीत शिकत होतो, असे आठवते. शाळा चुकवून खेळगड्यांसह याचे चित्रीकरण पाहिल्याचे स्मरणात आहे.
होय, माणसाला(ही) पंख असतात
 ध्येय, धुंदीचे पंख माणसास नसते, तर त्याचे जीवन आजच्याइतके रम्य खचीतच झालं असतं, असं सूचित करणारी माणसाला पंख असतात' ही खांडेकरांची शेवटची पटकथा.

 कवी अरविंद 'कमल' या टोपणनावाने कविता लिहीत असतो. काव्यप्रेमी मंजिरी कमलच्या कवितेची रसिक असते. कमल आपली मैत्रीण असल्याची बतावणी केल्याने मंजिरी अरविंदच्या प्रेमात पडते.

वि. स. खांडेकर चरित्र/८१