पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बड़ी माँ
 ‘बड़ी माँ' वरील हिंदी चित्रपटांपैकीच एक होय. 'बड़ी माँ'ची कथा दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. दुर्गादासला एक मुलगा असतो. दिनेश त्याचं नाव. दुर्गादासला त्याची कोण काळजी! कारण तो युद्धाच्या ऐन धुमश्चक्रीत लंडनमध्ये असतो. दुर्गादास हा घनश्यामचा ऋणको असतो. आपली मुलगी उषाशी दुर्गादास जर आपल्या राजेंद्रचे लग्न करील, तर आपण त्यास कर्जमुक्त देऊ, असं घनश्याम सुचवितो. राजेंद्र त्या वेळी मोना नामक नृत्यांगनेच्या साहाय्याने जपानसाठी हेरगिरी करीत असतो. जपानी सेना जेव्हा दिनापूरवर हल्ला चढवते, तेव्हा राजेंद्र स्वतंत्रतासेनानी बनून दिनेशच्या मदतीने पाडाव करतो, अशी युद्धकथा घेऊन येणारा बोलपट देशात ‘बड़ी माँ'च्या रूपाने चित्रित करून खांडेकर आपल्या बोधप्रद कथापद्धतीवर जणू शिक्कामोर्तबच करतात. सदरची कथा दुस-या महायुद्धावर आधारलेली आहे, हे वेगळे सांगायला नको.
 विनायकांच्या 'प्रफुल्ल पिक्चर्स'ने निर्मिलेला हा १२२ मिनिटांचा हिंदी बोलपट. यासाठी झिया सरहदी, राजा बढे, दिनकर द. पाटील, अंजूम पिलिभित्ती यांची गीते घेण्यात आली होती. माधव बुलबुलेंनी यांचे चित्रीकरण केलं, तर संगीत दिलं होतं के. दत्ता यांनी. यात नूरजहाँ, लता मंगेशकर, सितारा देवी, दामूअण्णा मालवणकर, प्रभृतींच्या भूमिका होत्या. लता मंगेशकरांना गायिका बनविणारा चित्रपट म्हणून याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याचं असं झालं की एका दृश्यात नूरजहाँला एक तान छेडायची होती. मास्टर विनायकांच्या काही ती पसंतीला उतरेना. त्यांनी उपस्थित असलेल्या व तेव्हा संगीताची तालीम घेत असलेल्या लतास ती तान ऐकविण्यास सांगितली. विशेष म्हणजे पहिल्याच शॉटमध्ये दृश्य ओके झालं. या घटनेनं नूरजहाँ व लताची घनिष्ठ मैत्री झाली. महायुद्धाच्या टंचाईग्रस्त परिस्थितीवर मास्टर विनायक यांनी मोठ्या जिद्दीने व शर्थीने चित्रपट पूर्ण केला. या पटाची निर्मिती मुंबईत ताडदेव येथील त्या वेळच्या सेंट्रल स्टुडिओत करण्यात आली. आज तिथं वातानुकूलित व्यापारी संकुल उभं आहे. ही पटकथा इतकी यशस्वी झाली की, विनायक त्यातून मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आपला ‘आशीर्वाद' बंगला बांधू शकले. हा आशीर्वाद खांडेकरांचा होता, हे काय सांगायला हवे? पण याबाबत मात्र मतभेद आहेत.
सुभद्रा

 ‘बड़ी माँ नंतर लगेचच हिंदी ‘सुभद्रा' प्रदर्शित झाला. ‘बड़ी माँ प्रमाणेच यालाही महायुद्धाची, तत्कालीन दंग्याची मोठी झळ लागल्याचं बोललं जातं.

वि. स. खांडेकर चरित्र/८३