पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या चित्रपट कथेत मंगेशकर भावंडांनी अनाथ मुला-मुलींची केलेली भूमिका संस्मरणीय ठरली होती.
 वि. स. खांडेकरांच्या या प्रभावी कथेबद्दल त्यांचे अभिनंदन करताना सुविख्यात चरित्र अभिनेते गजानन जहागीरदार यांनी आपल्या पत्रात लिहिलं होतं, 'In this picture you seem to have taken a deep break, open your shoulders and swing your bat in utter abandon, making for a clear boundry. Accept my warmest Shake-of-hands for this.' या उद्गारांतील औदार्य व अभिमान प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाचं प्रतिबिंबच म्हणावा लागेल. कुमारी मातांसंबंधी ‘माझं बाळ'च्या कथेनं समाजात भावजागर घडवून आणला. या कथेने अनाथ, निराधारांच्या संगोपन, पुनर्वसन कार्यासंबंधी समाजमन सक्रिय केले. समाजाचा संवेदनासूचकांक वर्धिष्णू करण्याचं केलेलं ऐतिहासिक कार्य ही या पटकथेची सर्वांत मोठी सामाजिक कमाई होती.
मानवी मूल्यांची 'सोनेरी सावली'
 मराठी चित्रपटांच्या इतिहासात वि. स. खांडेकरांच्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्द व कर्तव्याबद्दल जे लिहिलं गेलं आहे, ते 'छाया' (१९३६) ते ‘माझं बाळ' (१९४३) पर्यंतच्या प्रवासाबद्दलच. याचं कारण यानंतरच्या पटकथा, गीते, संवाद यांबद्दलची सामग्री व कागदपत्रे, पत्रव्यवहार उपलब्ध नसणं हे असावं. शिवाय खांडेकरांबद्दल जे लिहिले गेले ते 'हंस', 'नवयुग', फार तर 'प्रफुल्ल'पर्यंत; पण तेही विनायक आणि पेंढारकरांसंदर्भात; पण त्याशिवाय व त्यानंतर (१९४३) खांडेकर १९६२ पर्यंत चित्रपटसृष्टीत होते नि या काळात त्यांनी काही चांगल्या कथा मराठी चित्रपटसृष्टीस दिल्या. या काळातच त्यांचे अनेक हिंदी बोलपटही प्रदर्शित झाले. वि. स. खांडेकरांच्या चित्रपटविषयक कार्याच्या समग्र मूल्यांकनासाठी म्हणून तर ‘अंतरीचा दिवा' या ग्रंथाचा खरा घाट मी घातला आहे. या ग्रंथात खांडेकरांच्या चित्रपटविषयक कार्याचा आलेख रेखाटण्याचा प्रयत्न आहे. पुढील विवेचन हा त्याचाच एक भाग होय.
 सी. रघुवीर यांच्या ‘रघुवीर चित्र निकेतन, मुंबई'साठी वि. स. खांडेकर यांनी ‘सोनेरी सावली' ही पटकथा लिहिली. डिसेंबर, १९५३ मध्ये प्रदर्शित या बोलपटाची कथा खांडेकरांनी पूर्वदीप्ती शैलीत (Flash Back) विकसित केली आहे.

 बाळासाहेब फौजदारी वकील म्हणून प्रख्यात असतात. त्यांनी कष्टाने मिळविलेल्या संपत्तीमागे जे भोगले, ते मागे सारून सुखाच्या सोनेरी

वि. स. खांडेकर चरित्र/७९