पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपली कन्या शकुंतलेला आश्रमाच्या स्वाधीन करून, नर्सिंगचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहते. तिच्या दवाखान्यात व्यसनाधीन नामांकित वकील मनोहर उपचारार्थ दाखल होतो. शशी आपल्या शुश्रूषेने त्याला सुधारते. तो परत वकिली सुरू करतो. तेव्हा त्याच्याकडे भ्रूणहत्येची अनाथाश्रमाविरुद्धची केस येते. तो आश्रम संचालक अण्णांचे वाभाडे काढतो तेव्हा शशी उत्स्फूर्त साक्ष देऊन आपला पूर्वेतिहास व अण्णा नि आश्रमाचे कार्य स्पष्ट करते. मनोहर वकीलपत्र मागे घेऊन शशीच्या अनौरस कन्या शकुंतलास 'माझं बाळ' म्हणून स्वीकारतो.

 अशी कथा धारण करणाच्या या चित्रपटाचा पहिला खेळ ३ जुलै, १९४३ रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमागृहात झाला. पुण्यात २२ जुलै, १९४३ रोजी तर या चित्रपटाचे प्रदर्शन महर्षी कर्वे यांच्या उपस्थितीत करून मोठे औचित्य साधले गेले होते. चित्रपट पाहताना अण्णासाहेब कर्वे यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. ते अश्रू वि. स. खांडेकरांच्या कथेस लाभलेला मोठा पुरस्कारच होता. मास्टर विनायकांचे उत्कृष्ट दिग्दर्शन या पटास लाभले. अनेक अंगांनी हा बोलपट सर्वश्रेष्ठ ठरला. दादा साळवी यांनी साकारलेली अॅड. मनोहरची भूमिका दादांचा ‘लाईफटाइम रोल म्हणून गणली गेली. ती भूमिका पाहून सुविख्यात कायदेपंडित बॅरिस्टर नरिमन म्हणाले होते की, ‘मराठी भाषा' ही कोर्टाची भाषा होऊ शकेल की नाही, याबद्दल मी साशंक होतो; पण 'माझं बाळ' पाहून माझी खात्री झाली की, मराठी भाषा ही इंग्रजी भाषेइतकीच प्रभावी भाषा आहे. हे तर बँ. नरिमननी खांडेकरांच्या भाषेस बहाल केलेले प्रमाणपत्रच होते. “माझं बाळ पाहून वि. स. खांडेकरांवर पत्रांचा वर्षाव करणाऱ्यांत श्री.ज.जोशी, गजानन जहागीरदार, प्रभृती साहित्यिक, अभिनेते, कलावंत होते. मास्टर विनायकांनी ही कथा प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी म्हणून योजलेली समीपदृश्ये (Close ups) मोठी कलात्मक होती. माधव बुलबुले यांनी कॅमेऱ्याच्या नव्या तंत्राचा केलेला उपयोग प्रभावी ठरला. खांडेकरांच्या या कथेनं विनायकांना यशस्वी निर्माता बनविले. या चित्रपटाची निर्मिती कोल्हापूरच्या शालिनी सिनेटोनमध्ये करण्यात आली होती. १२० मिनिटांच्या या कृष्णधवल बोलपटाने परत एकदा सामाजिक कथेचे महत्त्व अधोरेखित केलं. बोलपटाचा विषय प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत भिडावा म्हणून माधव ज्युलियन यांच्या ‘प्रेमस्वरूप आई कवितेचा द्रष्टा वापर या चित्रपटात केला होता. विशेष म्हणजे या चित्रपटात हे गीत स्वतः माधव ज्यूलियन यांनी गायलं होतं. तेव्हा हे गीत प्रत्येकाच्या ओठी होतं.

वि. स. खांडेकर चरित्र/७८