पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सावलीत जगण्याची महत्त्वाकांक्षा असते. महत्त्वाकांक्षेच्या कैफात बाळासाहेब मानवी मूल्यांना पायदळी तुडवितात. हा कैफ इतका चढतो की, एक दिवस ते आपल्या बहिणीवरच हात टाकतात. वस्तुस्थिती कळेपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेले असते. हाती राहतो तो फक्त पश्चात्ताप आणि सर्व असून नसल्याचं आयुष्य भरून पुरेल इतकं शल्य!
 वि. स. खांडेकरांच्या या पटकथेसाठी राजा बढे यांनी गीतं लिहिली होती. दत्तोपंत कोरगावकरांचं याला संगीत लाभलं होतं. सी. रघुवीर याचे निर्माता-दिग्दर्शक होते. खांडेकरांना ठरलेलं मानधन न दिलं गेल्यानं मामला कोर्टनोटिसीपर्यंत गेल्याचे पत्रव्यवहारातून स्पष्ट होतं. मुंबईच्या अशोक स्ट्रडिओ आणि मुव्ही आर्ट सेंटरमध्ये या पटाची निर्मिती झाली होती. मीनाक्षी, कृष्णराव चोणकर, राजा नेने यांची भूमिका लाभलेला हा बोलपट फार काही यशस्वी ठरला नाही. ‘विनायकांच्या पश्चात माझा कथा पेलणारा दिग्दर्शक मला आढळला नाही.' या वि. स. खांडेकरांच्या विशादपूर्ण उद्गारांची प्रचिती देणारा हा चित्रपट!
 या चित्रपटाच्या पुस्तिकेत ‘सोनेरी सावली'चं कथासार देण्यात आलं आहे. शिवाय खांडेकरांनी ही पटकथा संवादाच्या रूपात लिहून, शिवाय ती दृश्यांच्या रूपातही सादर केली होती. तिचा उपलब्ध खर्डा अशासाठी आवर्जून दिला आहे की, पटकथा, संवादलेखनानंतर निर्मितीच्या दृष्टीने दिग्दर्शकाच्या सोईसाठी म्हणून दृश्यनिहाय कथेची मांडणी होत असते. त्यात दिग्दर्शक व लेखक मोठी मेहनत घेत असतात. ही रचना Titles, cut, inter cut, Quick Disolve, Mix, Fed out, Fed-in अशा निर्मितीतंत्राच्या अंगाने कशी लिहिली जाते, याची माहिती या क्षेत्राचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांना या पटकथेच्या वाचनातून होईल आणि त्यातून खांडेकरांची या क्षेत्रातील तांत्रिक कुशलता प्रत्ययास येईल.
‘अंतरिचा' ज्ञान ‘दिवा' मालवू नको रे!

 हृदयनाथ मंगेशकरांनी संगीताच्या क्षेत्रात उमेदवारी करीत निर्मितीच्या क्षेत्रात मुशाफिरी करण्याचे ठरविल्यानंतर त्यांना वि. स. खांडेकरांची आठवण न होती तरच आश्चर्य! मंगेशकर कुटुंब खांडेकरांच्या संस्कारांत नि त्यांच्या देखत मोठं झालं. मुळात या कुटुंबाच्या चित्रपट प्रवेशास मास्टर विनायक, वि. स. खांडेकर, दीनानाथ मंगेशकर यांचे प्रारंभीपासूनचे ऋणानुबंधच कारणीभूत होते. तेव्हा हृदयनाथ मंगेशकरांकडून मागणी होताच खांडेकरांनी त्यांना ‘अंतरिचा दिवा' पटकथा देणं स्वाभाविकच होतं.

वि. स. खांडेकर चरित्र/८०