पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेव्हा त्याला चक्षुर्वैसत्यमचं रूप येतं. ‘तुझाच'ची निर्मिती संपत आली असतानाच्या काळात तर विनायक व बाबूराव पेंढारकर यांच्यातील मतभेद विकोपाला गेले होते. विनायक पराकोटीचे अस्वस्थ होते. वि. स. खांडेकरांना लिहिलेल्या एका पत्रात विनायक म्हणतात, .... “अगदीच विस्कळीत झाले आहेत विचार! - वाटतं की पुन्हा नवीनच मांडावा संसार! - भोवतालचे विचार पटत नाहीत! - ते आपलेच आहेत, असं मानून काम करणं जमत नाही! मग खूप कुचंबणा होते. हे माझे विचार नव्हेत, असं म्हणायलासुद्धा व्यवहार मनाई करतो. नाही पण दुसरं काही करणं शक्य नसतं, तर ही गुलामगिरी ठीक होती. मी का सहन करावे हेच कळत नाही.
 या मतभेदातून मग मास्टर विनायकांनी स्वतंत्र संसार थाटून स्वतःचे ‘प्रफुल्ल चित्र' सुरू केलं; पण निर्माता, दिग्दर्शक, लेखक यांच्यातील विसंवाद व मतभेद जुनेच होते. शिवाय काही वेळा ते विकोपाला जायचे हे वि. स. खांडेकरांच्या एका प्रदीर्घ पत्रावरून स्पष्ट होईल. असे असले तरी विनायक व खांडेकरांचे संबंध अतूट राहिले ते मास्टर विनायकांच्या मनात खांडेकरांविषयी असलेल्या भक्तिभाव व श्रद्धेमुळेच. मतभेद होते; पण मनभेद नव्हते. यामुळे प्रफुल्ल'चे पहिले चित्र खांडेकरांच्या कथेचे असणं यात आश्चर्य नव्हतेच मुळी. विनायक प्रेमापोटी खांडेकरांनी ‘प्रफुल्ल चित्र'ला कथा दिली ती आजवरच्या कथेपेक्षा निराळी, नाट्यपूर्ण व नवलविशेष असलेली होती.
कुमारी मातेचे असले तरी ते 'माझं बाळ'
 त्या कथेचे नाव होते ‘माझं बाळ.' सन १८९६ साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली होती. तिथे त्यांनी कुमारी मातांना आश्रय देऊन बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले होते. त्यांनी केलेला विधवाविवाह व सुरू केलेले हे पुरोगामी कार्य यांमुळे तत्कालीन सनातन्यांनी त्यांच्यावर भ्रूणहत्येचे कुभांड रचले. वि. स. खांडेकरांसारख्या समाजशील, संवेदनशील लेखकाचं मन या साऱ्या व्यवहारात न द्रवतं तरच आश्चर्य! खांडेकर कर्वे यांचे कार्य जाणून होते. आपल्या ‘वैनतेय' मध्ये त्यांनी कर्वे यांच्याबद्दल भरभरून लिहिलेही होते. ते कर्वे यांना गुरू मानत. त्यांच्या सामाजिक कार्याचं व समाजसुधारणेचं महत्त्व कळावं म्हणून लिहिलेली ‘माझं बाळ'ची पटकथा समस्याप्रधान होती.

 शशी व रवींद्रचं एकमेकांवर प्रेम असते; पण शशीला दिवस जाताच तो विश्वामित्री पवित्रा घेतो. निराधार शशी अनाथाश्रमात आश्रय घेते.

वि. स. खांडेकर चरित्र/७७