पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिच्यात गुंततात; पण त्या नर्तकीचे प्रेम असते मधू नावाच्या कवीवर. तो पूर्वी बाळासाहेबांच्या मिलमध्येच कार्यालयात कामाला असतो. पतीची परीक्षा पाहायची म्हणून बाळासाहेबांची पत्नी आक्काताई कविमित्रास घरी ठेवून घेते, तेव्हा बाळासाहेबांच्या लक्षात येतं की मधु-मालतीचं प्रेम आहे. ते लक्षात येतं एका पत्रावरून, ज्यात शेवटी लिहिलेलं असतं, 'तुझाच मधू' इंग्रजीत या पटकथेचं नामकरण 'Ever Your's' करण्यात आलं होतं. ते पटकथेच्या पुस्तिकेवर छापण्यात आले होते.
 प्रेम आणि माया यांतील अंतर सांगणारी ही प्रेमकथा. 'संगम'प्रमाणे याचं दिग्दर्शन जुन्नरकरांकडे होतं. 'संगम'प्रमाणेच याचे थंडे स्वागत झाले. बाबूराव गोखल्यांसारखा नवा गीतकार ‘तुझाच' ला लाभला. या बोलपटात शाहीर अमर शेखांची एक छोटी भूमिका होती. 'स्नेहांकिता'कार स्नेहप्रभा प्रधान यांना अभिनेत्री म्हणून मान्यता देणारा हा बोलपट. ‘तुझाच'च्या दोन छापील पटकथा उपलब्ध आहेत. एक संक्षिप्त तर दुसरी दीर्घ. युद्धकाळात फिल्मचा तुटवडा असल्याने हा चित्रपट मग कमी लांबीचा (११,५०० फूट) करण्याचे ठरले, हे त्याचे कारण असावे असे पत्रव्यवहारावरून लक्षात येते. यातील संवाद हलकेफुलके होते. यातील खांडेकरांच्या इनमिनतीन गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली होती. ‘पाही कान्हा रोखुनि गाली सारखं गीत रसिकांच्या यातील विशेष पसंतीला उतरलं होतं. युद्धकाळामुळे तयारी होऊनही हिंदीऐवजी फक्त हा चित्रपट मराठीतच काढला होता, हे। पत्रव्यवहारातून स्पष्ट होतं हिंदी पटाची गाणी लिहून, चाली लावून तयार होती.
मतभेद म्हणजे मनभेद नव्हे!

 ‘वास्तविक सांपत्तिकदृष्ट्या 'हंस पिक्चर्स' यशस्वी व्हायला हवी होती. तथापि, विनायकांच्या पेशवाई थाटामुळे ते काही होऊ शकले नाही... पुढे एकोणचाळीस साली अभ्यंकर, राजगुरूंच्या साहाय्याने मी ‘नवयुग चित्र लिमिटेड' कंपनी स्थापन केली... तथापि 'नवयुग चित्रपट' या संस्थेला आमच्या ऐक्याचा आणि सहकार्याचा लाभ फार दिवस मिळू शकला नाही. ‘पटनिर्मितीचा सर्वाधिकार एकट्या मजकडे पाहिजे' असा पहिल्या चित्रानंतर विनायकाने हट्ट धरला. बाबूराव पेंढारकर आणि त्यांचे वैयक्तिक मतभेद विकोपाला गेले आणि त्याचा परिणाम असा झाला की, आधी कंपनीतून मी गेलो, नंतर बाबूराव निघाले आणि शेवटी ती कंपनी स्वतः विनायकाला पण सोडावी लागली.' असं 'हंस' व 'नवयुग' प्रवासातील पहिल्या दिवसापासूनचे साक्षीदार असलेले आचार्य अत्रे जेव्हा सांगतात,

वि. स. खांडेकर चरित्र/७६