पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशा नव्या बाजात भूमिकांचा साज मात्र जुन्या जोडगोळीकडेच होता - दामूअण्णा मालवणकर नि विष्णुपंत जोग.
 दिनांक ८ जानेवारी, १९४२ रोजी ‘सरकारी पाहुणे'चा मुहूर्त करण्यात आला. ‘सरकारी पाहुणे'चा पहिला खेळ ११ जून,१९४२ रोजी झाला. ‘लग्न पाहावं करून'पेक्षा वरचढ ठरलेल्या या पटकथेत खांडेकरांनी संस्थानिकांची दिवाळखोरी, खोटा बडेजाव इत्यादींचं उपहासात्मक चित्रण केलेय. आचार्य अत्र्यांच्या मदतीशिवाय साकारलेला हा बोलपट ‘नवयुग'साठी एक आव्हान होते. ते मास्टर विनायक व पेंढारकरांनी यशस्वीपणे पेलून दाखविले. काळाचे प्रभावी चित्रण करणारी पटकथा म्हणून खांडेकरांच्या या पटकथेकडे पाहिलं जातं. या पटकथा लेखनास अच्युतराव रानडे यांनी खांडेकरांना साहाय्य केल्याच्या नोंदी पत्रव्यवहारात आहेत. सरकारी पाहुणे' या कथेद्वारे वि. स. खांडेकरांनी महायुद्धपूर्व सरंजामी, दरबारी वातावरण व व्यवहारांचे जिवंत चित्रण केले आहे. १६४ मिनिटांच्या या कृष्ण-धवल हास्यपटात मास्टर विनायक हे प्रथमच निर्माते म्हणून आपणासमोर येतात. आजवर प्रेमगीते सादर करणाच्या जोगांनी शास्त्रीय संगीत असलेला तराणा यशस्वी रीतीने पेश केला तो याच बोलपटात. हास्य (Humour) आणि उपहास (Satire) यांचा सुंदर संगम म्हणून खांडेकरांच्या या पटकथेचे 'न भूतो न भविष्यती' असे स्वागत झाले. अत्र्यांची उणीव भासू न देण्याच्या कौशल्यातच खांडेकरांचं सारं श्रेष्ठत्व या कथेतून सिद्ध होतं.
मधु-मालतीची प्रेमकथा 'तुझाच'
 काल्पनिक कथेवर आधारित सुखान्त रंजक पटकथा असे 'तुझाच' बोलपटाच्या कथेचे वर्णन करता येईल. ही एक सुमार कथा होती. 'हंस' काय किंवा नवयुग' काय, त्यांचे चित्रपट मुहूर्त पाहूनच सुरू केले जात. काळे नावचे दरबारी ज्योतिष हे 'हंस'चे सल्लागार होते. ‘तुझाच'चा मुहुर्तही त्यांच्या सल्ल्यावरून पक्का करण्यात आल्याचा पुरावा र. श. जुन्नरकरांनी वि. स. खांडेकरांना लिहिलेल्या एका पत्रात उपलब्ध होतो. त्यात ते म्हणतात, “काळे ज्योतिषी यांच्या सांगण्यावरून १३ तारखेचा मुहूर्त शुक्रवार,१३ तारीख व शिवरात्र असूनसुद्धा विनायकरावांनी मान्य केला आहे. तेव्हा ठरल्याप्रमाणे मी त्या दिवशी सुरुवात करणार आहे.'

 'तुझाच'ही एक भावनाप्रधान प्रेमकथा. बाळासाहेब गोखले कापड मिलचे मालक असतात. मुंबईला त्यांची डेक्कन क्लॉथ मिल असते. ते पत्नीच्या नृत्यप्रेमामुळे मालती नावाच्या नर्तकीच्या संपर्कात येतात नि

वि. स. खांडेकर चरित्र/७५