पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आली होती. आजवरचे खांडेकरांचे सारे मराठी पट पंडित इंद्र यांनी रूपांतरित केले होते. मात्र ‘संगम'ची पटकथा व गीते हिंदीतील प्रख्यात कथा-कादंबरीकार अमृतलाल नागर यांनी रूपांतरित केली होती. त्यासाठी अमृतलाल नागर काहीकाळ कोल्हापुरी येऊन राहिल्याची आठवण त्यांनीच मला सन १९७८-७९ च्या माझ्या लखनौ मुक्कामात सांगितली होती. त्यांना मराठीची जाण होती. ते मुंबईतही राहिले होते. कोल्हापूरवर आधारित त्यांच्या काही हिंदी कथाही आहेत.
 ‘संगम'मध्ये कविवर्य भा.रा.तांबेंचं एक गीत ‘ते दुध तुझ्या या घरातले' घेण्यात आले होते. 'संगम'ची कथा म्हणजे झरा(निसर्ग) नि झोपडी (समाज)चा सुंदर मिलाफच होता, हे या गीतयोजनेनं स्पष्ट होतं. पात्र, प्रसंगांची रेलचेल असलेलं कथानक खांडेकरांनी विलक्षण कौशल्यानं गुंफलं होतं. कुंदा, काकी, इनामदार, मुकुंद,गार्ड, मावशी, कुंदाची आई, मोलकरीण, शेतकरी, भैयासाहेब, शांता, पुंडोपंत, मंजू, बाबूराव,पोलीस, काका इतक्या मोठ्या संख्येनं पात्रं पेलणारी ही खांडेकरांची पहिली कथा. ‘संगम'च्या निमित्ताने आळेकरांनंतर पहिले दिग्दर्शक म्हणून र.शं.जुन्नरकर खांडेकर यांच्या कथेस लाभले. पांडुरंग नाईकांच्या सातत्यानंतर पहिल्यांदाच खांडेकरांच्या कथेस अण्णासाहेब गुणेंसारखा नाईकांइतकाच गुणी, तोलामोलाचा छायाचित्रकार लाभला. सुंदराबाईंसारख्या गाजलेल्या (चार्ली चॅपलिनची प्रशंसा मिळविलेल्या) अभिनेत्रीची यातील मावशीची भूमिका सर्वांना भावली होती. मीनाक्षी व विनायकच्या जोडीनं गरिबी-श्रीमंतीचा समाजवादी संगम साकारला होता.
चंदनवाडचे सरंजामी सरकारी पाहुणे

 ‘अमृत' आणि 'संगम' या सामाजिक कथांच्या निर्मितीनंतर 'नवयुग चित्र'ने एकदा विनोदी चित्रपट काढण्याचं ठरवलं. लग्न पाहावं करून'चं यशही यामागे होतं. मग वि. स. खांडेकरांनी चिं.वि. जोशींच्या 'चिमणरावाचं चऱ्हाट'मधील ‘रावसाहेब चिमणराव - स्टेट गेस्ट' या कथेवर आधारित पटकथा तयार करून सरकारी पाहृणे' नावाने ती सादर केली. ‘चिमणराव'मधील । अन्य दोन कथांचाही या पटकथेस आधार आहे; कारण चिं. वि. जोशींना प्रत्येक कथेस रु. २५०/- प्रमाणे रु. ७५०/- मानधन व १०० फ्री पास देऊन करार केल्याची नोंद पत्रव्यवहारात सापडते. मास्टर विनायकांच्या दिग्दर्शनाखालीच खांडेकरांची ही पटकथा घेण्यात आली तरी निर्मितीची ही टीम नवी होती. गीतकार म्हणून राजकवी यशवंत, चित्रीकरण वासुदेव कर्नाटकींचं तर संगीत दत्ता डावजेकरांचं.

वि. स. खांडेकर चरित्र/७४