पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होते. वि. स. खांडेकरांनी चिं. वि. जोशी यांना २६ जून, १९४१ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, 'चित्रपट मंडळ्या व लेखक यांच्या व्यावहारिक संबंधात सुधारणा होणे जरूर आहे. ती सुधारणा आम्ही लेखकांनीच आपले महत्त्व पटवून देऊन हळूहळू घडवून आणली पाहिजे.  ‘लग्न पाहावे करून'सारख्या विनोदी पटांनी एक क्रांती केली. चित्रपटात आजवर सहायक भूमिका करणारे चित्रपटांचे नायक झाले. दामूअण्णा मालवणकर, विष्णुपंत जोग यांच्या भूमिका या संदर्भात अविस्मरणीय ठरल्या. वि. स. खांडेकर विनोदीही लिहू शकतात, यावर प्रेक्षकांचा विश्वास बसत नव्हता, हेच त्यांच्या लेखणीचे यश होते. फार कमी लोकांना या गोष्टीची कल्पना असावी की, त्याचं प्रारंभिक लेखन विनोदी व कोटीबाज शैलीचं होतं. चिं. वि. जोशींच्या कथेवर आधारित हा पहिला बोलपट. या बोलपटात फोटो दाखवून लग्न ठरविण्याच्या तत्कालीन पद्धतीचं विडंबन सादर करण्यात आलं होतं. उपहासात्मक कथालेखनाचा हा आविष्कार वि. स. खांडेकरांच्या लेखनशक्तीचा विस्मयकारी प्रत्यय देऊन जातो. ‘लग्न पाहावे करून'ची कथा सुखान्त. या हास्यरसपूर्ण पटाने मनोरंजनाची एक आगळी वाट मराठी चित्रपटात रूढ केली आणि रुजविलीही! १५० मिनिटांचा हा कृष्ण-धवल पट; त्या काळी एक यशस्वी चित्रपट म्हणून गणला गेला होता. असं असलं तरी काही चित्रपट समीक्षकांनी लग्न पाहावं करून'मधील दिग्दर्शन व अतिरिक्त (अतिरेकी) अभिनयाबद्दल त्या वेळी नाराजीही व्यक्त केली होती; पण हा दोष पटकथांचा नसून बॉक्स ऑफिसकडे डोळा ठेवून चित्रपटनिर्मितीची तत्कालीन अगतिकता त्यास कारणीभूत होती, हे आपणांस विसरून चालणार नाही. त्या काळी विश्राम बेडेकरांनी दिग्दर्शित केलेला विदूषक'सारखा दर्जेदार पटही समीक्षकांपुढे होता.

झाली ज्याची उपवर भगिनी
कन्या अथवा भाचि, मेहुणी
लग्न जमविण्या खटपट करणे
त्यास वाटते नको ते जिणे।।

म्हणून करण्यात आलेल्या 'लग्न पाहावं करून'च्या काव्यात्मक जाहिरातीने चित्रपट कथेचा उद्देश प्रेक्षकांसमोर ठेवून प्रथमदर्शनीच त्या वेळी ठाव घेतला होता आणि आपल्याकडे आकर्षित करायची किमयाही करून दाखविली होती.

वि. स. खांडेकर चरित्र/७१