पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अत्र्यांकडे गेलं. १ फेब्रुवारी, १९४० रोजी 'नवयुग चित्र'ची स्थापना करण्यात आली. 'हंस'ने आजवर खांडेकरांच्या ज्या कथांवर चित्रपट काढले, त्यांचे स्वतःचं असं एक आगळे वैशिष्ट्य होतं. सिनेसमीक्षक मो. बा. केळकरांच्याच शब्दांत सांगायचे, तर ‘खांडेकरांची कथानके भावनाप्रधान, ध्येयवादी, ‘जीवनासाठी कला' या संप्रदायाशी निगडित झालेली, कल्पनाविलासाने आणि शाब्दिक सौंदर्याने नटलेली असत. 'नवयुग चित्र'च्या स्थापनेनंतर स्वतःची नवी ओळख करून देण्याच्या उद्देशाने मनोरंजनपर चित्रपटाचे धोरण ‘नवयुग चित्र'ने स्वीकारले. यापूर्वी ‘पहिला पाळणा'सारखा विनोदी चित्रपट ब-यापैकी चालला होता. प्रेक्षकांची अभिरुची बदलत निघाली होती. हलकंफुलकं दिलं, तर युद्धग्रस्त वातावरणात लोकांना भावेल म्हणून विनोदी चित्रपट काढायचं ठरलं. यामागे अत्र्यांच्या ‘ब्रह्मचारी' (१९३८) व ब्रान्डीची बाटली' (१९३९) या यशस्वी, विनोदी पटांची प्रेरणा व अनुभव होता. या काळात आचार्य अत्रे यांच्याप्रमाणे चिं. वि. जोशी हे विनोदी लेखक म्हणून सर्वपरिचित झाले होते. विशेषतः त्यांच्या 'चिमणरावाचे चऱ्हाट' कथासंग्रहानं मराठी वाचकांवर मोहिनी घातली होती. त्यातील कथा घेऊन वि. स. खांडेकरांनी मराठी पटकथा व संवाद तयार करावे असे ठरले. वि. स. खांडेकरांनी ‘चिमणरावांचं चऱ्हाट'मधील 'लग्नसराई' व 'बोळवण' या दोन कथांवर आधारित 'लग्न पाहावे करून' ही पटकथा लिहिली.

 मराठी लॉरेल-हार्डी चिमणराव -गुंड्याभाऊंचा 'लग्न पाहावं करून' ‘नवयुग चित्र'या महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी तत्त्वावर चित्रपट कंपनीतर्फे पहिला चित्रपट म्हणून वि. स. खांडेकरांनी चिं. वि. जोशी यांच्या उपरोक्त कथांवर आधारित लिहिलेल्या 'लग्न पाहावे करून' या पटकथेची निवड करण्यात आली. ऑगस्ट १९४० च्या दुस-या आठवड्यात ‘लग्न पाहावे करून'चा मुहूर्त करण्यात आला. चिमणरावाच्या भूमिकेसाठी दामूअण्णा मालवणकर, तर गुंड्याभाऊंसाठी विष्णुपंत जोग यांची निवड करण्यात आली. लॉरेल-हार्डीसारखी ही जोडी प्रेक्षकांच्या मनात उतरविण्यात विनायक यशस्वी झाले. खांडेकरांनी तयार केलेलं कथानक, संवाद व गीते प्रभावी झाली. मराठी चित्रपट व साहित्यात चिमणराव, गुंड्याभाऊ अमर करण्यात या चित्रपटाचा मोठा वाटा आहे. त्या काळात पटकथा लेखकास फार अल्प मानधन दिले जाई. चिं. वि. जोशी यांना 'नवयुग चित्र'ने उपरोक्त गोष्टींसाठी अवघे पाचशे रुपये दिल्याचे चि. वि. जोशी व वि. स. खांडेकरांमधील पत्रव्यवहारातून स्पष्ट होते. याबद्दल दोघेही नाराज

वि. स. खांडेकर चरित्र/७०