पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/73

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोकणप्रेमाचे अपत्य 'अमृत'
 'हंस'ची स्थापना करून वि.स.खांडेकरांच्या कथेवर बोलपट काढायचा ठरल्यानंतर खांडेकरांनी सुचविलेली तशी ही पहिली कथा; परंतु त्या वेळी कोकणच्या पाश्र्वभूमीवर चित्रित या कथेच्या बाह्यचित्रणास मोठा खर्च यायचा, म्हणून ती मागे पडली होती, हे मागे स्पष्ट केले आहेच. लग्न पाहावं करून'च्या यशानं ही कथा पेलण्याचे सामर्थ्य मास्टर विनायक व बाबूराव पेंढारकर यांना दिले. लपंडाव' व 'लग्न पाहावं करून'च्या निर्मितीनंतर आचार्य अत्रे 'नवयुग'मधून बाहेर पडले. मग उभयतांनी स्वास्थ्याने 'अमृत'ची निर्मिती केली.

 वि. स. खांडेकरांच्या मूळ संकल्पित (अप्रकाशितही) चांभाराचा देव' कथेवर, कादंबरीवर आधारित 'अमृत'चे कथानक आहे. बाप्पा कोकणातील सावकार, स्वभावानं तसा खाष्ट. गरिबांची पिळवणूक करून तो श्रीमंत होतो. त्याचा एकुलता एक मुलगा विलास विनासायास आलेल्या संपत्तीमुळे व्यसनाधीन होतो. गावातील कृष्णा चांभाराच्या पत्नीवर त्याचा डोळा असतो. एका गोळीबारात कृष्णाची मुलगी जाईचा मृत्यू होतो. बाप्पा कृष्णावर आळ घेतो. कृष्णाची तुरुंगात रवानगी होते. पत्नी सीता सुडाने पेटते. तिच्या नादी लागलेल्या विलासचं बिंग फुटते. बाप्पाला आपण माडाच्या अमृताचे विष (माडी) केल्याचा पश्चात्ताप होतो. तो माडीचा व्यवसाय बंद करून व्यसनी गावास वरदान देतो - अशी ‘अमृत'ची सुखान्त कथा. हे कथाबीज अस्पृश्यतोद्धार, दारूबंदी इत्यादी तत्कालीन प्रबोधनपर प्रश्नांवर आधारित आहे. या कथेचा लोकशिक्षणाचा उद्देश स्पष्ट दिसून येतो. आदर्शवाद, समाजवाद ही या पटकथेची वैचारिक बैठक म्हणून सांगता येईल. या बोधप्रद कथेचे संवाद प्रभावी आहेत. १५३ मिनिटांचा हा कृष्णधवल बोलपट हिंदीतही चित्रित करण्यात आला होता. मराठीपेक्षा हिंदीत तो अधिक चालला. २४ मे,१९४१ रोजी त्याचा पहिला खेळ मुंबईच्या न्यू वेस्टएंड सिनेमात झाला होता. कर्फ्यूमुळे मुंबईत त्याचे प्रदर्शन स्थगित करण्यात आले होते. कोकणातील जातिभेदांवर बेतलेल्या या कथेचे चित्रीकरण वालावल, धामापूर, मालवण येथे करण्यात आले होते. मास्टर विनायक, बा. भ. बोरकर, प्रभृतींनी लोकेशनची निवड केली होती. 'अमृत'मधील ‘गमे सखी अंध मला हा शृंग' हे युगुलगीत धामापूरच्या तळ्याकाठच्या खडकावर चित्रित करण्यात आले होते. नटवर्य गोपीनाथ सावकर यांनी 'अमृत'साठी कोकणी लोकगीत लिहिले होते. बा. भ. बोरकरांनी त्यासाठी गोव्याहून खास लोकवाद्ये आणली होती.

वि. स. खांडेकर चरित्र/७२