पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वि. स. खांडेकरांचे चित्रपट म्हणजे दुःख सोसणाऱ्या चरित्रांची मालिकाच. 'देवता'मध्येही याचा प्रत्यय येतो. 'देवता'चं कथानक तसं विचारप्रधान. कौटुंबिक चित्र म्हणून ते गाजलं. 'देवता'चं कथानक हे अनेक नाट्यपूर्ण घटनांची शृंखला आहे. या नायिकाप्रधान बोलपटात ‘सुशीला' एक आदर्श स्त्रीचरित्र म्हणून खांडेकरांनी चित्रित केली आहे. स्त्रीला समाज मारून मुटकून देवता कसा बनवतो, याचं हृदयद्रावक चित्रण या चित्रपटात करण्यात आलं होतं. त्या वेळी हा चित्रपट स्त्री-प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरला होता. यातील गाणी अधिक लालित्यपूर्ण झाल्याने त्या वेळी ती घरोघरी गुणगुणली जात होती.
 या चित्रपटात मास्टर विनायक व बाबूराव पेंढारकरांच्या अभिनयाची जुगलबंदी संस्मरणीय ठरली. दिग्दर्शक मास्टर विनायकांनी ‘छाया'प्रमाणे येथेही आपले कौशल्य पणाला लावले. चित्रपटातील अभिनयाबद्दल मूल्यांकन करताना म्हटलं गेलं, “छाया' चित्रपटातील विदारक कारुण्य जितक्या प्रभावीपणे विनायकाने चित्रित केले तितक्याच तन्मयतेने त्याने 'देवता' चित्रित केले. लेखकाला अभिप्रेत असणारे प्रसंग त्याने अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपुढे ठेवले. समाजातील अन्यायाला वाचा फोडणारा, जीवनमूल्ये जिवापाड जपणारा आणि क्वचित आपल्या प्रेयसीशी एकांतात रमणारा नायक विनायकांनी बाबूरावांकरवी उभा केला. या चित्रपटात विनायकाने अगदी छोटी; परंतु अद्वितीय भूमिका केली ती कॉलेजच्या प्राचार्यांची! 'देवता' चित्रपटातील त्या एकाच लहानशा दृश्यात शिस्तप्रिय प्राचार्यांचे सर्व बारकावे त्याने असे रूपास आणले की, विनायकाच्या उत्कृष्ट भूमिकेत या छोट्या भूमिकेची गणना होऊ लागली."
 'देवता'च्या यशस्वी वाटचालीनंतर ‘मंदिर' नावाने हा बोलपट हिंदीत सन १९४७ साली चित्रित करण्यात आला. डब न करता याची स्वतंत्र निर्मिती करण्यात आली. मुळात ‘सूना मंदिर' नावाने हा चित्रपट काढायचे ठरले होते; पण नंतर सुलभतेसाठी त्याचे नामकरण फक्त ‘मंदिर' करण्यात आले. १६ जानेवारी, १९४७ रोजी मुंबईच्या राजकमल स्टुडिओत याचा मुहूर्त झाला. पुढे नव्याने झालेल्या ईस्टर्न स्टुडिओत ‘मंदिर'चे सारे चित्रीकरण झाले. शांता आपटे व शाहू मोडक यांची भूमिकेसाठी खास निवड करण्यात आली होती.
‘रम्य ते बघुनिया वेड लागे'असा :‘सुखाचा शोध'

 आनंद हा परोपकारी व निःस्वार्थी तरुण. घरासाठी झटणारा तसेच इतरांना हात देणारा.या भावनेने एका विधवेस तो आधार देऊन घरी

वि. स. खांडेकर चरित्र/६८