पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिची योजना ‘ज्वाला'मध्ये मुद्दाम करण्यात आली होती. १ एप्रिल, १९३८ रोजी हा बोलपट मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये मोठ्या दिमाखाने प्रदर्शित करण्यात आला होता. भव्यता व कलात्मकता यांचा सुंदर मिलाफ झालेला हा चित्रपट. या चित्रपटाची जाहिरात म्हणजे शब्दांची मनोरम आतषबाजी. हंसचे कलासामर्थ्य, खांडेकरांचा प्रतिभाविलास, विनायकांचे दिग्दर्शनपटुत्व,चंद्रमोहनची अभिनयपराकाष्ठा, रत्नप्रभेचे गानमाधुर्य, पांडुरंग नाईक यांचे प्रतिभानैपुण्य या सर्वांचा देदीप्यमान विलास म्हणजे हंस चित्र ‘ज्वाला'. अशी आकर्षक जाहिरात त्यावेळी केली जायची. अशा जाहिरातीचे अनेक नमुने मिळतात. १ एप्रिल, १९३८ रोजी सुरू झालेल्या चित्रपटाने निर्मात्यांना ‘एप्रिल फूल' केले खरे‌. ‘अंगार'च्या रूपाने खांडेकरांनी या कथेत महत्त्वाकांक्षी शूराचे, सेनापतीचे चरित्र रेखाटले आहे. महत्त्वाकांक्षेची ज्वाला माणसाला आंधळी बनविते, त्याचे अधःपतन सुरू होते व त्या ज्वालेतच त्याची शोकांतिका होते, असे चित्रण करणारा हा बोलपट.
दुःख सोसणाऱ्या चरित्रांची मालिका : देवता

 ज्वाला'मुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी व प्रेक्षकांचा रुचिपालट करण्याच्या इराद्याने 'हंस'ने आचार्य अत्रे यांच्या कथेवर आधारित ‘ब्रह्मचारी' व 'ब्रांडीची बाटली' हे बोलपट काढले. त्यानंतर हंस पिक्चर्सनी वि. स. खांडेकरांची कादंबरी ‘रिकामा देव्हारा'वर आधारित 'देवता'(१९३९) हा बोलपट प्रदर्शित केला. फेब्रुवारी १९३९ मध्ये मुंबईच्या 'वेस्ट एण्ड' सिनेमात प्रदर्शित या बोलपटाचे वैशिष्ट्य म्हणजे बोलपटावर आधारित कादंबरी ‘रिकामा देव्हारा' एक रुपयास तिकीटघरात विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली होती. या चित्रपटाच्या जाहिरातीची जबाबदारी शामराव ओक यांच्यावर सोपविण्यात आली होती. बाबूराव पेंढारकरांनी मराठी चित्रपटात आजवर केलेल्या सर्व भूमिका खलनायकाच्या होत्या. ‘देवता'मध्ये बाबूराव पेंढारकरांना प्रथमच नायकाची भूमिका मिळाली होती. ती त्यांच्या इच्छेचा आदर म्हणून देण्यात आली होती. हे लक्षात घेऊन 'देवता'च्या जाहिरातीत लिहिले जायचे, ‘पडद्यावरील बदमाश सुधारला!' या चित्रपटाचे गीतलेखन ग. दि. माडगूळकरांनी केले होते. मराठी अभिनेत्री व गायिका इंदिरा वाडकर यांचा हा गाजलेला बोलपट. १४८ मिनिटांचा हा बोलपट कृष्णधवल होता. वि. स. खांडेकरांनी आपल्या साहित्यात कला व जीवनाच्या श्रेष्ठत्वाबद्दल एक विशिष्ट भूमिका घेऊन - ‘जीवनासाठी कला'चे लेखन केले. 'देवता'चे कथानक याच पठडीतले.

वि. स. खांडेकर चरित्र/६७