पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणतो. विवाह झाल्यावर त्याची पत्नी माणिकबद्दल मोहभंग तो पचवू शकत नाही. परिणामस्वरूप नटीच्या जाळ्यात अडकतो. पुढे मद्यपी बनतो; पण सुखी काही होत नाही. शेवटी विधवा उषेस स्वीकारतो व सुखी होतो. असं कथानक घेऊन येणारा ‘सुखाचा शोध' बोलपट खांडेकरीय परंपरा जपणारा, आदर्शवादी, विचारप्रधानही आहे. तो सप्टेंबर, १९३९ मध्ये पुण्याच्या मिनर्व्हा'मध्ये प्रदर्शित झाला. पुढे या बोलपटाधारित ‘सुखाचा शोध' कादंबरी नोव्हेंबर, १९३९ च्या मध्यास प्रकाशित झाली. तिच्या पहिल्या आवृत्तीत चित्रपटातील काही दृश्यांची छायाचित्रेही अंतर्भूत करण्यात आली होती. या बोलपटाचे प्रेक्षकांनी चांगले स्वागत केले. ‘सुखाचा शोध' पटाचे समीक्षण करताना तारानाथनी प्रेक्षकांच्या चित्रपट पाहतानाच्या होणाऱ्या मनःस्थितीचे काव्यात्मक वर्णन करीत म्हटले होते, जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे' अशी प्रेक्षकांची स्थिती होऊन जाते. तर वि.स.खांडेकरांच्या कथाकाराचं या चित्रपटात पणाला लागलेलं कौशल्य लक्षात घेऊन श्यामराव ओकांनी खांडेकरांना ‘महाराष्ट्राचे मॅक्झिमम (मॅक्झिम) गॉर्की संबोधलं होतं. चित्रपटात संकलनाचा अभाव खटकतो. त्यापेक्षा कादंबरी सरस आहे, अशी त्या वेळच्या वाचक, प्रेक्षकांची प्रतिक्रिया होती. या काळात 'प्रभात'सारख्या कंपन्यांचे 'माणूस','माझा मुलगा यांसारखे बोलपट बाहेर पडत होते; पण खांडेकरांच्या पटकथांचे चांगले स्वागत व्हायचे. सुखाचा शोध'मधील माणिक शिक्षित, अहंकारी तर उत्तरार्धात नायिका उषा सुसंस्कृत देवता. खांडेकरांची प्रत्येक पटकथा म्हणजे निषेध आणि विवेकाचा चारित्रिक संघर्ष असतो. तत्कालीन एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये घरच्या कर्त्या पुरुषाच्या कुतरओढीचे मार्मिक चित्रण खांडेकरांनी या कथेत केले आहे. 'सुखाचा शोध' चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित करण्यात आला होता. हिंदीत तो ‘मेरा हक' शीर्षकाने प्रदर्शित करण्यात आला होता. हिंदी प्रेक्षकांनी या कथेचं मराठीप्रमाणेच स्वागत केलं. पूर्वार्ध आणि उत्तरार्धात स्वतंत्र नायिकेच्या या चित्रपटाच्या कथानकात केलेल्या प्रयोगाने चित्रपटसृष्टीत बहुनायक, नायिकांची प्रथा सुरू झाली. तिचे अनुकरण आज हिंदी चित्रपटात दिसते.
मराठी चित्रपटाचे 'नवयुग'

 सन १९४० उजाडता-उजाडता 'हंस'ची आर्थिक स्थिती मोठी हलाखीची झाली होती, हे मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर व वि. स. खांडेकरांच्या दरम्यान झालेल्या पत्रव्यवहारावरून पुरेसं स्पष्ट होते. म्हणून मग सहकारी तत्त्वावर फिल्म कंपनी काढायची टूम निघाली आणि त्याचं नेतृत्व आचार्य

वि. स. खांडेकर चरित्र/६९