पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझ्यासारख्या अभ्यासकाला नेहमीच अनुकरणीय वाटत आला आहे. खांडेकर मित्र आणि माणूस म्हणून वा. रा. ढवळे यांना मोठे वाटतात ते यामुळेच.
 व्यक्ती-विचार, चरित्र, कार्य, वाङ्मय अशा चतुर्दिक मार्गांनी थोरामोठ्यांचा खांडेकरांनी केलेला गौरव म्हणजे अशा माणसाचं चिरंतन व स्मरण इतिहासबद्ध करणंच होय. आचार्य विनोबा भावे, महर्षी धोंडो केशव कर्वे, शास्त्रज्ञ अल्बर्ट श्वाइट्झर, समाजसेवक एस.एम.जोशी, बाबा आमटे, साने गुरुजी, रवींद्रनाथ टागोर, कथाकार चेकॉव्ह अशी नावं त्यांच्यावरील अविस्मरणीय लेखांमुळे सहज आठवतात. ही खांडेकरांच्या गुणग्राहक वृत्तीची निशाणी म्हणूनही नोंदवावी लागेल. हा वारसा त्यांनी आपले लेखन गुरू नाटककार, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व राम गणेश गडकरी यांच्याकडून घेतला आणि ‘घेतला वसा टाकू नये' म्हणत जपला. खांडेकरांचं हे लेखन 'यशवंत',‘ज्योत्स्ना', ‘प्रतिभा', 'मनोहर','किर्लोस्कर इत्यादी मासिकांतून व 'लोकसत्ता', 'महाराष्ट्र टाइम्स','केसरी'सारख्या दैनिकांतून प्रकाशित होत राहिलं. या दैनिक वा नियतकालिकांनी खांडेकरांच्या उपरोक्त लेखांना मुखपृष्ठीय प्रसिद्धी देऊन त्या लेखनस्तरावर एका अर्थाने शिक्कामोर्तब केलं होतं. व्यक्तिचरित्रपर लिखाण खांडेकर मनस्वीपणी करीत. त्यासाठी बहुमुखी वाचन करीत. संदर्भ गोळा करणे, टिपणे काढणे, स्वतःची मते नोंदविणे या सर्वांतून खांडेकरांची संशोधन वृत्ती प्रत्ययास येते. त्या काळी असं लेखन म्हणजे खांडेकरांचं मान्यतापत्र मानले जायचे.
समीक्षक

 जुलै, १९१९ च्या 'नवयुग' मासिकात प्रकाशित झालेल्या ग. त्र्यं. माडखोलकरांच्या 'केशवसुतांचा संप्रदाय' लेखावर प्रतिक्रिया म्हणून लिहिलेला वि. स. खांडेकरांचा लेख ‘तुतारी वाङ्मय व दसरा' 'नवयुग' च्या सप्टेंबर, १९१९ च्या अंकात प्रकाशित झाला. या लेखांनी त्यांना समीक्षक, टीकाकार बनवलं. या लेखामुळे अनेक मासिकांनी त्यांना पत्रे पाठवून टीकासाहित्य मागितलं. 'महाराष्ट्र साहित्य', 'रणगर्जना' मध्ये खांडेकरांचं प्रारंभिक टीकसाहित्य प्रकाशित झालं. १९२४ ला सुरू झालेल्या वैनतेय' साप्ताहिकात त्यांनी चालविलेल्या परिचयाची परडी' सदरात त्यांनी अनेक ग्रंथांचे परीक्षण केले. ते तत्कालीन समीक्षक, साहित्यकार, संपादकांना भावले. सततच्या लेखनाने खांडेकर समीक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले. १९२० ते १९३० च्या दशकात त्यांनी विपुल समीक्षालेखन केले; पण ते शब्दप्रभू अधिक नि विचारगर्भ कमी, असं होतं.

वि. स. खांडेकर चरित्र/५३