पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्यांनी १९३२ साली लिहिलेल्या ‘गडकरी : व्यक्ती आणि वाङ्मय नि ‘आगरकर : चरित्र, व्यक्ती व कार्य' सारख्या ग्रंथांनी समीक्षक खांडेकरांची चिकित्सक, अभ्यासू समीक्षक म्हणून मराठी वाचकांना ओळख झाली. ‘वनभोजन' (१९३५), ‘धुंधुर्मास' (१९४०), ‘मराठीचा नाट्यसंसार (१९४५), 'वामन मल्हार जोशी : व्यक्ती आणि विचार' (१९४८), रेषा आणि रंग' (१९६१), 'रंग आणि गंध' (१९६१), सारख्या ग्रंथांनी खांडेकरांच्या समीक्षालेखनाचे नवे विक्रम स्थापित केले. खांडेकरांची भाषणे ही त्यांच्या प्रगल्भ समीक्षकाची मौखिक प्रतिमाने होत. वरील ग्रंथांतील काही लेखसंग्रह होत. त्यात अनेक समीक्षात्मक लेखांचा अंतर्भाव आहे. याशिवाय वि. स. खांडेकरांनी वेळोवेळी विविध मासिके, साप्ताहिके, दैनिकांतूनही पुस्तक परीक्षणे लिहिली, समीक्षात्मक लेख लिहिले. अशा असंकलित परीक्षण नि लेखांची संख्या १५0 च्या घरात आहे.
 खांडेकरांचे प्रारंभिक टीकालेखन आक्रमक होते. त्यात आशयापेक्षा अभिनिवेश अधिक असायचा.पुढे ते अधिक चिकित्सक झाले. त्यांच्या समीक्षालेखनात व्यक्तिद्वेष वा मत्सराची भावना नसायची. वाङ्मयाचा प्रवाह शुद्ध ठेवण्याची धडपड असायची. पुढे त्यांनी अंतर्मुख करणारे टीकालेखन केले. खांडेकरांचं समीक्षालेखन बहुमुखी जसं होतं (शैलीच्या रूपानं!) तसं ते साहित्य रूपाच्या निकषांवर वैविध्यपूर्णही होतं. खांडेकरांनी समीक्षेतून साहित्य नि माणसांत अद्वैत निर्माण केलं. खांडेकरांचं समीक्षा लेखन प्रांजळ आहे. विविध भाषा व साहित्याच्या अभ्यासामुळे खांडेकरांच्या समीक्षालेखनास तुलनात्मकतेचा स्पर्श आहे. विश्वपटलावर मराठी साहित्य कुठं आहे, याचं भान त्यांचं समीक्षालेखन देतं. त्यांचं टीकालेखन निश्चित निष्कर्ष वाचकांपुढे ठेवून प्रतवारी निश्चित करतं. त्यामुळे ते अधिक निर्णायक झालं आहे. खांडेकर आपल्या समीक्षालेखनातून सत्यान्वेषण करतात. त्यात त्यांचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्पष्ट होतो. खांडेकरांची समीक्षा विश्लेषक, विवरणात्मक, पृथक्करणात्मक, संश्लेषणात्मक अशा अनेक शैलींनी आकारते, फेर धरते.

 खांडेकरांची समीक्षा विचारयुक्त, उपरोधिक, हार्दिक, कल्पक अशा अनेकविध गुणांनी युक्त असली तरी कधी-कधी ती पाल्हाळीक आणि अनावश्यक विस्तृत होत राहते. असे असले तरी खांडेकरांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे व कलात्मक लेखनामुळे ती मराठी समीक्षेत एक नवी वाट निर्माण करणारी, नव्या पिढीस मार्गदर्शन करणारी, प्रेरक नि म्हणून वाचनीय होते.

वि. स. खांडेकर चरित्र/५४