पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कवी आणि गीतकार
 एखादा साहित्यकार चतुरस्त्र लेखन करतो, त्यातील विशिष्ट साहित्यप्रकार वाचक, समीक्षक पसंत करतात. तो लेखक त्या साहित्य प्रकाराचा प्रतिनिधी म्हणून सर्वपरिचित राहतो. वि.स.खांडेकरांनी कथा, कादंबरी, नाटक, निबंध, रूपककथा, चरित्र, आत्मचरित्र, पटकथा, व्यक्तिचित्रे, पत्रे, भाषणे ,मुलाखती, भाषांतर, समीक्षा लिहिल्या, असं सांगितल्यावर कुणाला आश्चर्य वाटत नाही; पण खांडेकर कवी व गीतकार होते असे म्हटल्यावर ऐकणाऱ्यांच्या वा वाचणाऱ्यांच्या भुवया उंचावतात याचे कारण त्यांची प्रचलित ओळख ही कादंबरीकार आणि कथाकार म्हणून असणे होय.
 खरे तर वि.स.खांडेकर साहित्याच्या क्षेत्रात सन १९१९ ला आले ते समीक्षक आणि कवी म्हणून. जुलै,१९१९ च्या'नवयुग'च्या अंकात ‘तुतारी वाङ्मय व दसरा' हा टीका लेख व ‘होळी' ही कविता प्रकाशित झाली होती. वि.स.खांडेकर प्रारंभीच्या काळात ज्या कविता करीत, त्या ‘कुमार' या टोपणनावाने प्रकाशित होत. हा प्रघात सन १९२८ पर्यंत सुरू होता. ‘लोकमित्र'च्या एप्रिल, १९२८ च्या अंकात प्रकाशित 'मानवी आशा' शीर्षक कविता ‘वि. स. खांडेकर' नावाने प्रथम प्रकाशित झाली. मृत्यूपर्यंत ते कविता लिहीत राहिले. त्यांची शेवटची प्रकाशित कविता कवी कुसुमाग्रज संपादन करीत असलेल्या 'कुमार' मासिकात सन १९७५ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली. तिचे शीर्षक होते ‘शाप नव्हे हा!' डॉ. अविनाश आवलगावकर यांनी खांडेकर जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या समग्र कविता व गीते संपादित करून प्रकाशित केली आहेत. यांची संख्या १३७ आहे. याशिवाय माझ्या संशोधनात हाती आलेल्या काही प्रकाशित, अप्रकाशित अशा २० कविता आहेत. सुमारे २०० कविता व गीते लिहिलेल्या खांडेकरांची ओळख साहित्यरसिक व अभ्यासकांना न होणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल.

 ‘पहिली पावलं' हे वि.स.खांडेकरांचं साहित्यिक आत्मकथन मी संपादित केलं आहे. ते मराठीतलं पहिलं साहित्यिक आत्मकथन असावं. त्यात कवितेतलं पहिलं पाऊल सांगणारा लेख आहे. तो अभ्यासताना लक्षात येतं की, बालवयातच खांडेकरांवर कवितेचे संस्कार झाले. बालपण गणपतीच्या मंदिरात गेल्यानं अभंग, ओव्या, कीर्तन, प्रवचनांचा नकळत बालमनावर प्रभाव होता. शाळेत जाऊ लागल्यावर गुरुजींनी शिकविलेली “आई, थोर तुझे उपकार' कविता चिरस्मरणीय ठरली, ती गुरुजींच्या डोळ्यांत शिकवताना पाणी उभारले म्हणून. इंग्रजी शाळेत गेल्यावर अन्य

वि. स. खांडेकर चरित्र/४९