पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कवींबरोबर वर्डस्वर्थ भेटला. मग गोल्डस्मिथ, शेले, कीट्स, स्कॉटशी मैत्री झाली. मराठी नवनीत' हाती आले. प्राचीन कवी भेटत गेले. ‘काव्यदोहन' वाचलं नि ‘तुतारी' विशेष भावली. मग ‘केशवसुतांची कविता' भेटली. तिनं विशेष प्रभावित केले, म्हणून खांडेकर घर सोडून शिरोड्याच्या शाळेस गेले. तेव्हा त्यांच्या पिशवीत एकमेव पुस्तक होतं व ते 'केशवसुतांची कविता.' या कवितेने त्यांच्या एकांत व पोरक्या दिवसांत त्यांना विशेष साथ दिली. त्यांचा कविपिंड पोसला तो गोविंदाग्रज, बालकवी, चंद्रशेखर, रेंदाळकर, प्रभृती कवींमुळे.
 वि. स. खांडेकरांच्या कविता ‘उद्यान','महाराष्ट्र साहित्य', 'नवयुग', ‘अरविंद','लोकमान्य', 'प्रमोद’, ‘सुमन', 'मनोरंजन', 'रत्नाकर', 'यशवंत' इत्यादी नियतकालिकांतून सन १९३०-३१ पर्यंत नियमित प्रकाशित होत होत्या. भा.रा.तांबे, गिरीश, यशवंत, गोविंद, मनमोहन,काव्यविहारी, इत्यादी कवी हे खांडेकरांचे समकालीन कवी. खांडेकरांवर प्रारंभी केशवसुत, गोविंदाग्रज यांच्या कवितांचा प्रभाव होता. त्यांनी सामाजिक,राष्ट्रीय,सांस्कृतिक विषयांवर कविता लिहिल्या तशा व्यक्तींवरही लिहिल्या. झेंडा, बालविधवा, भाऊबीज, शिव-निर्माण, आगरकर या शीर्षकांवरून ते स्पष्ट होईल. कविता प्रकारच्या दृष्टींनी पाहिले तर प्रेमकविता, निसर्गकविता, वीरगीते, बालगीते, चित्रपट गीते, सुनीत, व्यक्तिकविता अशा तऱ्हेतर्हेच्या कविता खांडेकरांनी लिहिल्या.
 या काळात रविकिरण, तुतारी, इत्यादी कविमंडळे होती; पण खांडेकर त्यांत नव्हते. त्या काळात ते कविता समीक्षक म्हणून अधिक गाजले. खांडेकरांचा मूळ पिंड हा कवीचा, हे त्यांच्या आलंकारिक भाषेमुळे स्पष्ट होत असले तरी फार प्रभावी कविता ते देऊ शकले नाहीत; याचे कारण त्यांची कविता बऱ्याचदा तंत्र सांभाळण्यात हरवून जाते. त्यांच्या कवितेचे समीक्षक व रविकिरण मंडळातील गेय कवी रा. अ.काळेले यांनी म्हटले ते खरे आहे की, "खांडेकरांच्या कवितेत केशवसुतांचा संवेग आहे; पण आवेगी बेगुमानपणा नाही. गोफणीने हाणाहाण करताना खांडेकरांच्या कवितेच्या गोफणीतले दगड मऊ पडतात." असे असले तरी खांडेकरांची कविता समकालीन संदर्भाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

 त्यांच्या कवितेचा गाभाघटक अन्य साहित्यप्रकाराप्रमाणे जीवनमूल्य, समाज परिवर्तन, माणसाची घडण हाच राहिला आहे. त्यांची कविता त्यांच्या साहित्याप्रमाणेच पुरोगामी आहे. गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद, मानवतावाद इत्यादी विचारधारांशी नातं जोडणारी ही कविता अंतिमतः मानवहितकारी कविता म्हणून लक्षात राहते.

वि. स. खांडेकर चरित्र/५०