पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यात एक प्रकारची स्वयं केंद्रितता असते. या निबंधात तत्त्वचिंतनाबरोबरने समाजचिंतनही प्रगटते. त्यात निसर्गवर्णनही येते. या निबंधातून खांडेकरांचा वाचनव्यासंग उमगतो. भवभूती पासून स्टीफन झ्वाइगपर्यंत, ‘सौभद्र'पासून ‘बिवेअर ऑफ पिटी'पर्यंत खांडेकरांच्या वाचनाचा झोला आपण अनुभवतो. या निबंधातही खांडेकरांचे लेखनदोष डोकावतात; पण ती लेखकाची लेखनलकब म्हणून येते. खांडेकरांनी आपल्या समग्र लेखनात विविध प्रयोग केले, तसे लघुनिबंधातही कधी त्यांनी स्वतंत्र निबंध लिहिले, तर कधी पात्रांद्वारे. उदा. स्वराज्य साप्ताहिक प्रकाशित निबंध (‘मुखवटे'मध्ये संग्रहित) या संदर्भात पाहणे औचित्यपूर्ण ठरेल.
 वि. स. खांडेकरांनी आपल्या काही लघुनिबंध संग्रहांना लिहिलेल्या प्रस्तावनांतून (विशेषतः ‘हिरवळ') वा ‘प्रदक्षिणा' मधील त्यांच्या लेखातून त्यांचा लघुनिबंध उद्भव, विकास, स्वरूप, तंत्र, इत्यादींचा अभ्यास स्पष्ट होतो. या अभ्यासामुळे व वाचनामुळे ते सरस लघुनिबंध लिहू शकले. डॉ.आनंद यादव यांनी त्यांच्या लघुनिबंधांची चांगली चिकित्सा केली आहे. त्यानुसार निसर्गचित्रण, सखोल चिंतन, कल्पनाविहार, समृद्ध अनुभव, शैलीवैविध्य, आलंकारिक भाषा, इत्यादींमुळे खांडेकरांचे लघुनिबंध वाचनीय ठरल्याचे स्पष्ट होते.

 वि. स. खांडेकरांचे 'वैनतेय', 'अखंड भारत’,‘ज्योत्स्ना', ‘स्वराज्य इत्यादी नियतकालिकांतून केलेल्या स्तंभलेखनामुळे ते विपुल व विविध लघुनिबंध लिह शकले. बहारीचा प्रारंभ, वैचित्र्यपूर्ण विकास आणि तात्त्विक शेवट यांमुळे त्यांचे निबंध वाचकांना अंतर्मुख करीत राहिले. त्यांच्या निबंधात साध्या विषयातून मोठा आशय सांगण्याचे सामर्थ्य आढळतं. कल्पनाविलास, संवादशैली, भाषासौंदर्य, सुभाषितांची पेरणी, चमत्कृती, जिव्हाळा, इत्यादींमुळे हे निबंध कलात्मक झाले आहेत. खांडेकरांच्या निबंधांत विषय, ओघ, मांडणी, कल्पना,भावना, तत्त्व, भाषा, निष्कर्ष असा अष्टावधानी गोफ गुंफलेला असतो. ‘लघुनिबंध हा वैचित्र्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा, विकसित रसिकतेचा आणि अनुभवसंपन्न आत्म्याचा आविष्कार आहे. अशी खांडेकरांनी केलेली लघुनिबंधाची व्याख्या लक्षात घेता त्यांचे निबंध हा मराठी साहित्याचा अनमोल ठेवा सिद्ध होतो. अनिर्बध विषयांत, मुळापेक्षा खोडावर भर, इत्यादींसारखे दोष वगळता हे लघुनिबंध म्हणजे विशिष्ट आत्मनिष्ठेचे प्रकट चिंतन होय. साहित्यकार खांडेकरांची जीवनदृष्टी समजून घ्यायचे अमोघ साधन म्हणून त्यांच्या लघुनिबंधांचे असाधारण महत्त्व आहे.

वि. स. खांडेकर चरित्र/४८